कोल्हापूर : शेतकऱ्यांना दिलेली फसवी कर्जमाफी, दूध दरासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना सुकाणू समितीच्या वतीने सोमवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जेल भरो’ आंदोलन करणार असल्याची माहिती माजी आमदार संपतराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार नकारात्मक असून, जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत लढाई सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.संपतराव पवार म्हणाले, राज्य सरकारने जून २०१७ मध्ये सरसकट कर्जमाफीची घोषणा केली; पण त्यांतील अटी, निकष पाहता कर्जमाफीऐवजी कर्जवसुलीची मोहीम सरकारने राबविली. दूध दरवाढीविरोधात संघर्ष केल्यानंतर प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली. त्याची अंमलबजावणी केली जात नाही.
पावडर उत्पादनावर दूध संघांना प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी त्याचा उत्पादकांना काहीच फायदा नाही. शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहण कायदा धाब्यावर बसविला जात आहे.
दडपशाहीने प्रकल्पासाठी जमिनी काढून घेतल्या जात आहेत. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जेल भरो’ आंदोलन करणार आहोत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महावीर गार्डन, कोल्हापूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी नामदेव गावडे, अमित कांबळे, केरबा पाटील, बाबूराव कदम, संतराम पाटील, आनंदराव लांडगे, आदी उपस्थित होते.