कोल्हापूर : साखर कारखान्यांना ऊस पाठवून दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांना अद्याप एफआरपी प्रमाणे पैसे मिळालेले नाहीत. हातात पैसे नसल्याने शेतकरी अडचणीत असताना साखर विभाग याबाबत काहीच कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक टाळे ठोकल्याने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले. बहुतांशी कारखान्यांनी पहिल्या महिन्यातील गाळप झालेल्या ऊसाचे पैसे आदा केले आहेत. उर्वरित बिले न दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच साखरेचे दर कमी झाल्याने साखर कारखान्यांनी एफआरपी मध्ये मोडतोड करून प्रतिटन २५०० रूपये पहिली उचलीची घोषणा केली आहे.
कार्यालयासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.(छाया- आदित्य वेल्हाळ)
कायद्याने ऊस गाळपास आल्यानंतर चौदा दिवसात एफआरपी प्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे, पण साखर आयुक्त कार्यालय याबाबत कारखान्यांवर काहीच कारवाई करत नाही.
या निषेधार्थ सोमवारी दुपारी रघूनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील व युवा संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर कार्यालयातील कर्मचाºयांना बाहेर काढून टाळे ठोकले आणि तेथून निघून गेले.लक्ष्मीपुरी पोलीसांचा फौजफाटा तिथे दाखल झाला. त्यांनी पंचनामा करून कुलूप तोडले, संबधितांवंर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, सोमवारी आंदोलन करणार असल्याचे ‘अंकुश’ संघटनेने पोलीसांना कळविले होते, त्यांचे रद्द पण शेतकरी संघटनेच्या अचानक झालेल्या आंदोलनाने पोलीसांची तारांबळ उडाली.कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की!संघटनेचे कार्यकर्ते कार्यालयात आल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. कर्मचारी जागेवरून उठेपर्यंत त्यांनी हाताला धरून कार्यालया बाहेर काढल्याने गोंधळ उडाला. यामध्ये कनिष्ठ लिपीक आर. एस. उपाध्ये यांना धक्काबुक्की झाली.
ऊन्हात बसूनच केले जेवणसंघटनेचे कार्यकर्ते कुलूप लावून लगेच जीप मधून निघून गेल्याने कर्मचाऱ्यांना तिसऱ्या मजल्यावरील टेरीसचा आसरा घ्यावा लागला. पोलीस येऊन पंचनामा करून कुलूप तोडू पर्यंत दोन तास गेल्याने रखरखत्या उन्हातच कर्मचाऱ्यांना उभे राहावे लागले. सहकार अधिकारी विजय वाघमारे हे शुगरचे पेशंट आहे. वेळेत जेवण घ्यावे लागत असल्याने त्यांनी चक्क उन्हात बसूनच जेवण केले.
ऊस गाळप होऊन दोन महिने झाले, तरी अद्याप पैसे मिळालेले नाहीत. साखरेच्या दरातील घसरणीमुळे एफआरपीचे तुकडे सुरू केले आहेत. हे बेकायदेशीर असताना साखर विभाग संबधितांवर काहीच कारवाई करत नसेल तर त्यांना कशाला पोसायचे? म्हणून टाळे ठोकले.- हणमंत पाटील,सांगली जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना