कोल्हापूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गुळाला मानांकन मिळवून देण्यासाठी बाजार समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसार गूळ बनविला तरच त्याला चांगला भाव मिळू शकेल, असा विश्वास शेतीमाल व्यवस्थापन अभ्यासक गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात बाजारसमितीत ‘कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन’ या विषयावर गूळ उत्पादकांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये पुण्याचे तज्ज्ञ हिंगमिरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद लाभला.हिंगमिरे म्हणाले, कोल्हापुरी गुळाला पूर्वापार परंपरेनुसार चांगली मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्याभोवतीच्या नद्यांमुळे येथील जमिनीची सुपिकता अधिक आहे. परिणामी, ऊस उत्पादन चांगले होते, उताराही चांगला होतो, त्यामुळे असा ऊस गूळ बनविण्यास उपयुक्त आहे.
या भौगोलिक परिस्थितीनुसार गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने लाभ उठवावा. त्यातून कोल्हापूरच्या गुळाला आधिकाधिक भाव मिळू शकेल तसेच ‘जीआय’ (केंद्राच्या अटीप्रमाणे) चा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने गूळ बनविण्याच्या प्रक्रियेसाठी घालून दिलेल्या अटी, नियमांचे शेतकऱ्यांनी पालन करावे, असेही ते म्हणाले.गुळात वापरले जाणारे रसायन, आर्द्रता यांचे निकषही नियमांनुसारच पाळावेत, असे सांगून हिंगमिरे म्हणाले, ऊस लागवडीपासून ते गूळ बनविण्यापर्यंतची प्रक्रिया ‘जीआय’ नियमानुसार झाल्यास गूळ जास्तीत-जास्त दर्जेदार बनून भावही चांगला मिळेल. ही प्रक्रिया एका शेतकऱ्यांला शक्य नसली तरीही शेतकऱ्यांनी सामुदायिक पद्धतीने गूळ उत्पादन घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.या कार्यशाळेस बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, संचालक परशुराम खुडे, बाबासाहेब खोत, उपसचिव मोहन सालपे, सचिव दिलीप राऊत आदी उपस्थित होते.गुळात साखर घालण्याचे प्रकार टाळावेतहिंगमिरे म्हणाले, अलीकडच्या काळात गूळ बनविताना त्यात साखर घालण्याचे प्रमाण वाढले आहे, पण साखर घालून बनविलेला गूळ हा ‘जीआय’ प्रमाणित मानला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी असे प्रकार टाळावेत, असेही त्यांनी आवाहन केले.