कोल्हापूर : गणेशोत्सवानंतर मंगळवारपासून पितृपंधरवडा(पितृपक्ष) सुरू होत आहे. पितृपक्षात कुटूंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावे महालय केले जाते. दुसरीकडे अजूनही महालय कालावधीबद्दल अनेक समज-गैरसमज असल्याचे पाहायला मिळते.अनंत चर्तूदशीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून पितृपंधरवडा असतो. अनंत चर्तूदशीनंतरची पौर्णिमा ते सर्वपित्री अमावस्या या पंधरा दिवसांच्या कालावधीत कुटूंबातील व्यक्तीचा मृत्य झाला त्या तिथीला त्यांच्या नावे पूजा करून आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. कावळ््याला नैवेद्य ठेवला जातो. वयस्कर व्यक्तींना जेवायला बोलावले जाते. या विधीला महालय किंवा बोली भाषेत महाळ म्हणतात.या पंधरा दिवसांबद्दल अजूनही नागरिकांमध्ये समज गैरसमज आहेत या दिवसात कोणत्याही देवाधर्माचे विधी, कुटूंबातील शुभकार्ये, उत्सव, समारंभ, नवीन वस्तूंची खरेदी केली जात नाही. त्यामुळे या कालावधीत बाजारपेठेतही उलाढाल कमी असते. त्यानंतर मात्र घटस्थापना होवून नवरात्रौत्सवाला सुरवात होत असल्याने हे पंधरा दिवस म्हणजे बाजारपेठेसाठी उत्सवाची तयारीच असते.