कोल्हापूर : कोडोली (ता. पन्हाळा) येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत प्रलंबित भटके विमुक्त समाजाच्या वसाहतीस तत्काळ परवानगी द्यावी, या मागणीसाठी समाजकल्याण सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांना भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने बुधवारी घेरावो घालण्यात आला.निर्माण सामाजिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत नाथपंथी डवरी समाजाची वसाहत कोडोली येथे वसविण्यासाठी समाजकल्याण कार्यालयाकडे १७ मे २०१६ रोजी प्रस्ताव सादर केला होता. गेल्या दीड वर्षापासून हा प्रस्तावाचा पाठपुरावा करीत असताना परिषदेच्या कार्यकर्त्यांना केवळ या कार्यालयाकडून पोकळ आश्वासने दिली जात आहेत.
कोल्हापुरातील समाजकल्याण कार्यालयात भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने प्रलंबित वसाहतीच्या मागणीकरिता समाज कल्याण सहायक आयुक्तांच्या दालनाबाहेर पारंपरिक गोंधळ घालत शासनाचा निषेध केला. (छाया : नसीर अत्तार)
त्यामुळे बुधवारी भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने या प्रस्तावास ३१ मार्च २०१८ पर्यंत परवानगी द्यावी; अन्यथा भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने सर्व भटके समाजातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील, असा इशारा परिषदेचे जिल्हा संयोजक अशोक लाखे यांनी सहायक आयुक्तांना दिला. यावेळी दीड तासाहून अधिक काळ प्रथम सहायक आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर पारंपरिक पद्धतीने ‘गोंधळ’ घालून शासनाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर सहायक आयुक्तांना घेरावो घालण्यात आला.आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना सहायक आयुक्त कामत यांनी ६ एप्रिल २०१८ पर्यंत याबाबतची बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कोडोली व मोरेवाडी या दोन ठिकाणांचा प्रस्ताव तयार आहे. यात झोन ठरविण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. त्यानंतर हा घेरावो मागे घेण्यात आला.यावेळी सुभाष साळोखे, शशांक देशपांडे, राजू वैदू, संतोष साळोखे, लक्ष्मण चव्हाण, दिगंबर गदाडे, धारती गंगावणे, विवेक भोसले, साहेबराव भांडे, राजू लाखे, रवी लाखे, आदी उपस्थित होते.