कोल्हापूर : विविध ट्रॅफिक सिग्नलवर लाल सिग्नल असताना वाजणाऱ्या अनावश्यक हॉर्नमुळे कोल्हापूर शहरातील ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. सायबर महाविद्यालयातील पर्यावरण व्यवस्थापन विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून हे चित्र समोर आले आहे.
शहरातील विविध परिसरातील निवडक बारा ट्रॅफिक सिग्नलवर या विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक सिग्नलवर लाल सिग्नल असताना किती अनावश्यक हॉर्न वाजतात त्याची नोंद करण्यात आली. लाल सिग्नल पडल्यानंतर सर्व वाहनांना हिरवा सिग्नल होईपर्यंत थांबणे सक्तीचे असते, तरी देखील काही वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण वाढते.
जास्तीत जास्त अनावश्यक हॉर्न लाल सिग्नलचे अखेरच्या दहा सेकंद बाकी असताना वाजतात, असेदेखील यावेळी केलेल्या पाहणीत आढळून आले. हे सर्वेक्षण पर्यावरण व्यवस्थापन विभागातील प्रा. के. डी. आहिरे आणि विद्यार्थ्यांनी केली.
लाल सिग्नल असताना वाजणाऱ्या अनावश्यक हॉर्नची संख्या
सिग्नल संख्या
- माउली चौक ४३५
- बस स्टँड ६३७
- सायबर चौक ५४३
- शिवाजी चौक ४६४
- श्री गणेश मंदिर ७३६
- लक्ष्मीपुरी चौक ६९३
- उमा टॉकीज चौक ५७५
- हॉकी स्टेडियम ४८२
- संभाजीनगर ४४७
- जनता बझार चौक ४४७
- तलवार चौक ५५१
- ताराराणी चौक ७१९
या सर्वेक्षणातील आकडेवारी धक्कादायक आहे. अनावश्यक हॉर्न वाजविण्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. नागरिकांनी वाहन चालविताना संयमाने, जबाबदारीपूर्वक वर्तन केले पाहिजे.- प्रा. के. डी. आहिरे