कोल्हापूर : दिव्यांग अॅथलिट अजय सखाराम वावरे याला त्याने बंगलोर येथे राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र पडताळणी करून हवे होते. मात्र, क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या प्रभारी कारभारामुळे त्याला अनेक महिने हेलपाटे मारावे लागले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. अखेरीस त्याला सोमवारी क्रीडा कार्यालयाने प्रमाणपत्र पडताळणी करून दिले.दिव्यांग खेळाडू अजयने बंगलोर येथे सन २०१२ मध्ये राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली होती. दिव्यांग खेळाडूंना नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण असल्याने त्याने जुलै २०१८ मध्ये कोल्हापुरातील क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडे प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी दिले होते. मात्र, वारंवार वेगवेगळी कारणे व योग्य कागदपत्रे नसल्याचे कारण देऊन माघारी पाठविले जात होते.
अजयसाठी त्याची आई कल्पना या सातत्याने कार्यालयाच्या फेऱ्या मारत होत्या. प्रत्येक वेळी वेगळी कारणे दिली जात होती. यात कधी उपसंचालक नसल्याचे, तर कधी कागदपत्रांत त्रुटी असल्याचे सांगून माघारी पाठविले जात होते. सर्व कागदपत्रांचीपूर्तता केल्यानंतर मागील महिन्यात पॅरा असोसिएशनचे पत्र मागितले. तेही अजयच्या आईने कार्यालयात जमाही केले तरीही पुन्हा तोच पाढा वाचला जात होता.
याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर पुन्हा यंत्रणा गतिमान झाली. अखेरीस क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडून सोमवारी दुपारी अजयची आई कल्पना यांना बोलावून प्रमाणपत्र पडताळणीचे पत्र दिले.
प्रत्येक वेळी कार्यालयाकडून वेगवेगळी कारणे देऊन मला माघारी पाठविले जात होते. त्यात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आणि यंत्रणा गतिमान झाली. सोमवारी मला कार्यालयाने बोलावून पडताळणीचे पत्र दिले. हे केवळ ‘लोकमत’मुळे शक्य झाले.कल्पना वावरे, दिव्यांग अॅथलीट अजयची आई