कोल्हापूर : न्यु शाहुपूरी परिसरातील पाटणकर कॉलनी येथील जुन्या दुमजली घरासह जनावरांच्या गोठ्यास विजेच्या शॉर्ट सर्किटने भीषण आग लागुन म्हैशीचा होरपळून मृत्यू झाला. गाय भाजून जखमी झाली असून प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले.
घराला लागुन असलेल्या सर्जेराव श्रीपती बनसोडे यांच्या दोन खोल्याही या आगीमध्ये जळाल्या. या आगीमध्ये सुमारे १५ लाखाहून अधिक किंमतीचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणली. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.अधिक माहिती अशी, जयसिंग श्रीपती बनसोडे (वय ८५) यांचे न्यु शाहुपूरी, पाटणकर कॉलनीमध्ये २०४ नंबरचे चाळीस वर्षापूर्वीचे दुमजली जुने घर आहे. बनसोडे हे पत्नी, दोन मुलांसह सुना, नातवंडे यांच्यासोबत राहतात. घराला लागुन पत्र्याचे शेडवजा जनावरांचा गोठा आहे. म्हैस, गायीसाठी वाळलेला ऊसाचा पाला, गवत भरुन ठेवले होते.
सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक गोठ्याच्या बाजूने आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट बाहेर आले. बघता..बघता आगीने उग्ररुप धारण केले. जीवाच्या भित्तीने बनसोडे कुटूंबिय घराबाहेर पडले. त्यांनी आरडाओरड करताच शेजारील लोक धावत आले. त्यांनी अग्निशामक दलास वर्दी दिली.
काही क्षणात पाण्याच्या बंबासह अग्निशमन दलाचे जवान आर. के. चिले, मनिष रणभिसे, कांता बांदेकर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घर बोळात असल्याने आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यांनी घराच्या चारही बाजूंनी पाण्याचा फवारा मारुन आग आटोक्यात आणली. त्यानंतर महापालिकेच्या पोकलँन्ड मशिनद्वारे घराच्या भिंती पाडून गोठ्यातील जखमी गायीला बाहेर काढले.
तिच्या शेजारी आगीमध्ये होरपळून पडलेली म्हैस होती. हे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. जवानांनी घरातील जळालेले प्रांपचिक साहित्य बाहेर काढले. टिव्ही, फ्रिज, बेड, अंथरुण, कपडे, पैसे यासह इतर साहित्य आगीमध्ये जळाले. घराला लागुन असलेल्या सर्जेराव श्रीपती बनसोडे यांच्या दोन खोल्याही या आगीमध्ये जळाल्या. या आगीमध्ये सुमारे १५ लाख किंमतीचे नुकसान झाले.नागरिकांसाठी मदतीसाठी धावन्यु शाहूपुरी परिसर उच्चभ्रु वस्तीचा आहे. या घराच्या चारही बाजूला हॉटेल, रुग्णालय आणि बंगले आहेत. घराला आग लागल्याचे समजताच येथील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. रुग्णालयाने डॉक्टरांसह रुग्णवाहिका सज्ज ठेवली. हॉटेल व्यवस्थापनाने आग विझविणाऱ्या जवानांना पाण्याच्या बाटल्या देवून मदत केली.बनसोडे कुटूंबियांचा आक्रोश जयसिंग बनसोडे यांची दोन मुले रमेश आणि भानुदास खासगी नोकरी करतात. अडीच गुंठ्याच्या जागेमध्ये त्यांचे घर आहे. आगीमध्ये हे घर जमिनदोस्त झालेच शिवाय म्हैसही मृत्यूमुखी पडल्याने बनसोडे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटूंबाच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावून गेली.