कोल्हापूर : संशोधन, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, सामाजिक बांधीलकीची जपणूक, आदींच्या जोरावर डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फे्रम’ (एनआयआरएफ) या मूल्यांकनात विद्यापीठाने पहिल्याच वर्षी देशात ९७ वा आणि राज्यात नववा क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी अशा विद्यापीठाच्या सर्व घटकांच्या कष्टांमुळे हे यश मिळाले आहे, असे डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि कुलगुरू डॉ. प्रकाश बेहेरे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा ‘नॅक’चे ‘ए’ मानांकन मिळाले. आमदार सतेज पाटील यांच्या आग्रहानुसार या वर्षी पहिल्यांदाच आमच्या विद्यापीठाने ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केला.
विद्यापीठाच्या सर्व घटकांनी केलेल्या कष्टांमुळे ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनात देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्था, विद्यापीठांमध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाने ९७ वा क्रमांक मिळवीत स्थान पटकाविले. भविष्यात विद्यापीठाला ‘टॉप फिफ्टी’मध्ये नेण्याचा मानस आहे. विद्यापीठाचे संशोधनात चांगले काम सुरू आहे. त्याला गती दिली जाईल.कुलगुरू डॉ. बेहेरे म्हणाले, आमचे विद्यापीठ खूप नवीन आहे. ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध योजनांमध्ये विद्यापीठाला सहभागी होता येणार आहे. विद्यापीठाच्या वैद्यकीय व परिचारिका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्रातील गरजू रुग्णांना मोफत सेवा दिली जाते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. काही गावेही दत्तक घेतली आहेत. त्याचे धर्मादाय आयुक्तांनी कौतुक केले आहे.या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. आशा पाटील, वेणुगोपाल, वसुधा निकम, वैशाली गायकवाड, डॉ. राजेश कल्लाप्पा, सी. डी. लोेखंडे, आर. के. शर्मा यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, वित्त अधिकारी शाम कोले, उपकुसचिव संजय जाधव, प्राचार्य महादेव नरके, आदी उपस्थित होते.
दोन विभागांत पहिल्या ५० मध्ये विद्यापीठअध्यापन-अध्ययन स्रोत, संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष वापर, सामाजिक बांधीलकी, लोकांच्या दृष्टीने विद्यापीठ कसे आहे, सर्वांना सोबत घेऊन काम केले जाते का? अशा गटांमध्ये ‘एनआयआरएफ’ने मूल्यांकन केले.
यातील सामाजिक बांधीलकी आणि विद्यार्थ्यांनी समाजात जाऊन काम करणे या विभागात विद्यापीठ पहिल्या ५० मध्ये असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, विद्यापीठ नियोजनबद्ध आणि दूरदृष्टीने कार्यरत आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक केंद्र म्हणून कोल्हापूरची ओळख निर्माण झाली आहे.