कोल्हापूर : राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी पाच रुग्णालये रडारवर आहेत. या रुग्णालयांची कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर निलंबित केलेल्या रुग्णालयातील या योजनेतील रुग्ण अन्य रुग्णालयांत हलविण्याचे काम सुरू झाले आहे. निलंबित केलेल्या रुग्णालयांची इत्यंभूत माहिती उद्या, बुधवारी किंवा गुरुवारी (दि. १८) प्रसारमाध्यमांना पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जिल्ह्यात कारवाईस सुरुवात केली. ३४ रुग्णालयांवर छापे टाकून एक रुग्णालयास निलंबित केले. या छाप्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेक डॉक्टरांचे धाबे दणाणले. सध्या दोन पथके जिल्ह्यात कार्यरत आहेत. या पथकाला पाच रुग्णालये संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यांनी या रुग्णालयातील कागदपत्रांची तपासणी सुरू ठेवली आहे. त्यामुळे ही पाच रुग्णालये पथकाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले.त्याचबरोबर जे रुग्णालय निलंबित झाले आणि होणार आहेत, त्या रुग्णालयांतील या योजनेत उपचार घेत असलेल्या रुग्णांना समाविष्ट असलेल्या अन्य रुग्णालयांत हलविण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे.
‘आरोग्य मित्र’ अडचणीत...रुग्णालयाबरोबर रुग्णांची कागदपत्रे घेणारे ‘आरोग्य मित्र’ अडचणीत आले आहेत. या ‘आरोग्य मित्रां’ची चौकशी करण्यात आली असून पथकाने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. ३४ रुग्णालयांत ‘आरोग्य मित्र’ कार्यरत आहेत. या कारवाईमुळे चार ते पाच ‘आरोग्य मित्र’ अडचणीत आले असल्याचे सांगण्यात आले.निलंबित रुग्णालयांची यादी वेबसाईटवर?कोल्हापूर जिल्ह्यात जी रुग्णालये निलंबित होणार आहेत. या रुग्णालयांच्या माहितीची यादी लवकरच महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.