कोल्हापूर : कर्जमाफीच्या ५३ हजार खातेदारांच्या पिवळ्या यादीच्या पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत साधारणत: ३५ हजार खात्यांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यापैकी सुमारे चार हजारच खातेदार पात्र ठरले आहेत.शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा अर्ज भरताना तारखेच्या ठिकाणी महिना आणि महिन्याच्या ठिकाणी तारीख भरली गेली आहे. त्यामुळे कर्ज वसूल व कर्जमाफीचा कालावधीमध्ये तफावत दिसत आहे.
त्याचबरोबर ज्यांनी अर्ज भरलेला नाही, अशा काही खातेदारांची नावेही यामध्ये समाविष्ट असल्याने आयटी विभागाने ५३ हजार ८८६ खातेदारांची पिवळी यादी पडताळणीसाठी बँकांकडे पाठविली आहे. जिल्हा बँकेकडून पडताळणीचे काम सुरू आहे.
आतापर्यंत साधारणत: ३५ हजार खात्यांची तपासणी झाली असून त्यामध्ये चार हजार खातेदार पात्र ठरल्याचे समजते. उर्वरित डाट्यामधून फारसे पात्र ठरतील, असे वाटत नाही.
लिंक आल्यानंतरच गती येणारतालुकास्तरीय समितीने तपासलेला डाटा अपलोड करण्यासाठी आयटी विभागाकडून लिंक येणार आहे. शनिवारी दुपारपर्यंत लिंक आल्यानंतर कर्जमाफीच्या कामास गती येणार आहे.