कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे, या मागणीसाठी महिलांनी गांधीनगरजवळ असलेल्या पंचगंगा नदीच्या तीरावर जल आंदोलन पुकारले आहे. या आंदोलक महिलांची भेट घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने गेले असता त्यांच्यासमोरच काही आंदोलक महिलांनी पाण्यात उड्या मारल्याची घटना शुक्रवारी घडली.
गेल्या दिन दिवसांपासून या महिला पंचगंगा नदीच्या तीरावर जल आंदोलन करत आहे. आज या आंदोलक महिलांचे निवेदन स्वीकारण्यासाठी खासदार धैर्यशील माने आंदोलनस्थळी आले होते. त्यावेळी काही महिलांनी थेट नदीत उड्या घेत आंदोलन केले. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. छत्रपती शासन संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
हजारो महिला त्या ठिकाणी जमल्या आहेत. या भागात मायक्रो फायनान्सचे आर्थिक जाळे आहे. पुरामुळे या महिलांना कर्ज फेडणे शक्य नाही. कमी प्रमाणात बचतगट आहेत. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा कर्जमाफी द्यावी, अशी या महिलांची मागणी आहे. यासंबंधी मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. कोणतीही वसूली पूरग्रस्त भागात होऊ नये, असे आदेश जिल्हाधिऱ्यांनी दिले आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांशी यांसंदर्भात बोललो असून पुढील आठवड्यात भेटून चर्चा करणार आहे, असे यासंदर्भात बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापूरात ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र, या पुराच्या फटक्यातून अद्याप नागरिक सावरले नाहीत. तसेच, कर्ज घेणाऱ्या हजारो महिला अस्वस्थ आहेत. त्यातच मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज वसुली सुरू आहे. त्यामुळे महापुरात सर्व वाहून गेले असून अद्याप सरकारी मदत मिळाली नाही, असे असताना मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्ज फेडायचे कोठून, असा सवाल करत या महिलांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. तसेच, मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज व्हावे, अशी मागणी या आंदोलक महिलांनी केली आहे.