जयसिंगपूर : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पूरग्रस्त हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याला भेट देऊन लोकांना पुराने घाबरू नका, आम्ही पाठीशी आहोत, असे सांगून दिलासा देत बाधित परिसराची पाहणी केली.
शरद सहकारी साखर कारखाना, पद्माराजे हायस्कूल शिरोळ या ठिकाणी वास्तव्यासाठी असलेल्या पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली, आणि आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे सांगितले. त्यानंतर शिरोळ तहसीलदार कार्यालयात प्रांत अधिकारी समीर शिंगटे, आणि तहसीलदार सुरज गुरव यांना भेटून पूरपरिस्थितीची सद्यस्थिती व आवश्यक त्या उपाययोजना याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
पुरात अडकलेल्या नागरिकांना तातडीने बाहेर काढा, विशेषत वृद्ध महिला, लहान मुले यांना प्राधान्याने सुरक्षितस्थळी हलवा त्यांच्या खाण्यापिण्याची आणि औषधाची काळजी घ्या, अशा सूचना प्रशासनाला दिल्या. गरज पडल्यास आम्हाला सांगा, आमच्याकडे अनेक सेवाभावी संस्था मदत करायला तयार आहेत, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. शरद साखर कारखाना, दत्त साखर कारखाना, घोडावत ग्रुप मदत करीत असल्याचे मला समजले आहे, आणखी मदतीची गरज आहे, आम्ही ती करू, पूरग्रस्तांच्या पाठीशी आम्ही आहोत असेही अजित पवार म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर, माजी सभापती मिनाक्षी कुरडे, सुभाष सिंग रजपूत, संजय यड्रावकर योगेश पुजारी, पद्मसिंह पाटील, प्रताप उर्फ बाबा पाटील, विजयसिंह माने देशमुख यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.