शिरोली/कोल्हापूर: पुणे बंगळूर महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथे महापुराचे सुमारे आठ फुट पाणी आले आहे. महामार्गावरील पाणी पातळी चार फुटांनी वाढली आहे. कोल्हापूरच्या जनतेच्या सेवेसाठी इंडियन आर्मी, एनडीआरआफचे जवान सांगली फाटा येथे दाखल झाले आहेत.
शिरोली येथे महामार्गावर सकाळी सात वाजता पुणे येथील आर्मी चे पथक दाखल झाले. सध्या महामार्गावर आठ ते नऊ फूट पाणी आलं आहे. पाण्याची पातळी वाढत चालली असुन पाण्याला मोठा प्रवाह आहे. या महामार्गावरची परिस्थिती पाहण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांनी दुपारी दोन वाजता येऊन पाहणी केली तसेच इंडियन आर्मी च्या जवानांशी चर्चा केली. आणि बोटीतूनच ते कोल्हापूरच्या दिशेने गेले.
महामार्गावर अडकलेल्या प्रवासी, पोलीस, आर्मीचे जवान ट्रक, वाहनधारक यांच्या राहण्याची, जेवणाची, चहा नाष्टाची सोय अनेक दानशुर लोकांनी केली होती.
शिरोली मधील सुमारे पन्नास टक्के भाग तर हालोंडी गाव शंभर टक्के पाण्याखाली गेला आहे. या लोकांना सुरक्षीत स्थळी हालवण्यात आले आहे.