नृसिंहवाडी : महापुराच्या निवारणासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातुन अद्ययावत ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून प्रथमच शिरोळ तालुक्यात हा प्रयोग राबविण्याबाबत विचार सुरू आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसत असल्याने हा प्रयोग प्रभावी ठरणार आहे. तसेच महापूर निवारणासाठी जागतिक बँकेकडून निधी मिळणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. नृसिंहवाडीत महापूर स्थितीची पाहणी करुन पूरग्रस्तांशी संवाद साधला. कृष्णा नदीची जलप्रणाली ही दोन राज्यांमध्ये असल्याने समन्वयासाठी संबंधित ठिकाणी तज्ञ अभियंत्यांची टीम कार्यरत आहे. मुख्यमंत्र्यांशी या विषयावर माझी सखोल चर्चा झाली असून लोकसभेमध्ये हा प्रश्न मी केंद्र शासनाकडे मांडला आहे." असेही खासदार माने यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरणच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना महापूर काळात ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, सरपंच चित्रा सुतार, उपसरपंच रमेश मोरे, सदस्य धनाजीराव जगदाळे, शशिकांत बड्ड-पुजारी, सागर धनवडे, अभिजीत जगदाळे, प्रवीण दळवी, अमर नलावडे, सागर मोरबाळे, प्रवीण आणुजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.सुरक्षित राहण्याचे आवाहनमहाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या योग्य समन्वय सुरु असून खा. माने यांनी सर्वांनी सुरक्षित राहून पुराच्या पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
ए. आय. तंत्रज्ञानामुळे कृष्णा नदीत पडणाऱ्या पावसाची माहिती जलद मिळणार असून मानवी चुका टाळल्या जाणार आहेत. शाहुवाडी, पन्हाळा भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. पंचगंगा, दूधगंगा नद्यांसह कृष्णा नदीचा काठ ढासळत आहे. या तंत्रज्ञानामुळे या सर्व गोष्टीचे रीडिंग अचूकपणे मिळणार आहे. - धैर्यशील माने , खासदार