शिरोली/कोल्हापूर : पंचगंगा नदीतील जलपर्णी व नदी प्रदूषणाला जबाबदार धरत शिवसेनेने सोमवारी महापालिकेचा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. शिये येथील पंचगंगा पुलाजवळील नदीपात्रात जागतिक फुटबॉल स्पर्धा भरवली. यावेळी शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मंडळाचे फुटबॉलचे खेळाडू उपस्थित होते.यावेळी वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले,पंचगंगा नदी ही विषारी नदी बनली असून नदीत मैला सोडला जातो, विविध कारखान्यांचे पाणी सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषित झाली असून जलपर्णीमुळे नदीची आताची स्थिती क्रीडांगणासारखी झाली आहे.
याला जबाबदार फक्त कोल्हापूर महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ असून प्रातिनिधिक स्वरूपात यांचा निषेध करण्यासाठी महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध करत जागतिक फुटबॉल स्पर्धेचे या नदीपात्रात आयोजन केले आहे.यावेळी शिवसैनिकांनी महापालिकेच्या व प्रदूषण नियंत्रण महामंळाच्या विरोधात जोरात घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, उप जिल्हा प्रमुख बाजीराव पाटील, सुजित चव्हाण, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव,शियेचे सरपंच रणजित कदम, बाजीराव पाटील, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, तानाजी आंग्रे,शशी बिडकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.प्रशांत गायकवाड : यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड म्हणाले सप्टेंबर महिन्यात कोल्हापूर शहरातील जयंती नाल्यावरील मैला व्हावून नेणारी पाईपलाईन फुटलेली आणि कोणतीही प्रक्रिया न होता हा मैला थेट पंचगंगा नदीत येत होता, त्यामुळे ही जलपर्णी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. तसेच कारखान्याची मळी, सांडपाणी यामुळे जलपर्णी वाढली आहे.
नदीच्या पाण्याचे नमुने क्षेत्र अधिकारी संजय मोरे, अविनाश कडले यांनी पंचगंगा नदीच्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. तसेच जलपर्णी बाबत प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव मुंबई येथील प्रदुषण महामंडळाच्या कार्यालयात पाठवून वरीष्ठ कार्यालयातुन प्रस्ताव आला की मंत्रालयात संपूर्ण प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
शिये-बावडा पुलाशेजारी मोठे हिरवेगार मैदानचशिये-बावडा पुलाशेजारी जलपर्णी मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली आहे. याठिकाणी मोठे हिरवेगार मैदानच तयार झाले आहे. कुठेच पाणी दिसत नाही. या जलपर्णीतच शिरोली , वारणेची आणि शियेची जॅकवेल आहे. या जॅकवेल मधुन दररोज पिण्याचे पाणी उपसले जाते. आणि हे प्रदुषित पाणी दररोज लाखो लोक पितात.