सचिन भोसले - लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम आता बायो-बबल पद्धतीने सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये विना प्रेक्षक केवळ संघांमध्ये कोरोना सुरक्षिततेच्या अटी-शर्तींसह सामना आयोजित होण्याची शक्यता आहे. त्याकरिता कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन प्रयत्नशील आहे.
कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम नोव्हेंबर ते जून या दरम्यान होतो. यात सोळा संघांमध्ये प्रथम के.एस.ए. लीग फुटबाॅल स्पर्धा आयोजित केली जाते. त्यातही कनिष्ठ संघांकरिता ब, क, ई अशा दोन संघांत वरिष्ठ गटात येण्यासाठी स्पर्धा होतात. त्यानंतर सतेज चषक, नेताजी-अटल चषक, चंद्रकांत चषक, महासंग्राम, राजेश चषक, महापौर चषक, आदी स्पर्धा होतात. त्यात किमान दीडशे सामने फुटबाॅल पंढरी शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर होताात. मात्र, कोरोनाच्या कहरामुळे कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम १३ मार्च २०२० पासून संपुष्टात आला आहे. अजूनही कोरोनामुळे नवा हंगामही रखडला आहे. नवा हंगाम सुरू करण्याकरिता आयएसएल, आयलीग स्पर्धेप्रमाणे बायो-बबल पद्धतीचा अवलंब होण्याची शक्यता आहे. यात खेळाडू, प्रशिक्षक, पंच यांना कोरोनाच्या सर्व चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाचीही मंजुरी आवश्यक आहे. या पद्धतीने हंगाम सुरू करण्यासंबंधी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनही प्रयत्नशील आहे.
चौकट
काय आहे बायो-बबल पद्धत
कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू, पंच, प्रशिक्षक यांना बाह्य जगापासून विभक्त केले जाते. त्यांची थर्मल, आरटीपीसी. अँटिजेन तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना सामने, स्पर्धा खेळण्यास परवानगी दिली जाते. या सर्व चाचण्या नियमित केल्या जातात. याच पद्धतीने कोलकाता येथे आयलीग फुटबाॅल स्पर्धा झाली, तर गोवा येथे आयएसएल लीग फुटबाॅल स्पर्धा सुरू आहे.
कोट
या पद्धतीने यंदाच्या हंगामाची सुरुवात करण्यासाठी के.एस.ए. प्रयत्नशील आहे. हे सर्व जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व मंजुरीनंतरच होईल. संघांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- प्रा. अमर सासने , फुटबाॅल सचिव , के.एस.ए.