कोल्हापूर : बांधकामाची परवानगी मिळाल्यानंतरसुद्धा तसे आदेश देण्यात विलंब लावणाऱ्या उपशहर रचनाकार नारायण भोसले यांच्या निषेधार्थ माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी चक्क नगररचना विभागाच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयास टाळे ठोकले.
एकाच कामास तेरा वेळा चकरा मारूनही भोसले भेटत नाहीत म्हटल्यावर मोरे यांनी आपला अनावर झालेला राग अशा प्रकारे व्यक्त केला. दहा मिनिटांनी मात्र नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून स्वत: मोरे यांनीच टाळे खोलले.स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, त्यांच्या प्रभागातील चार कामांच्या फाईलचा पाठपुरावा करीत आहेत. एक वर्ष होऊन गेले तरीही त्यांची कामे प्रलंबित आहेत.
एक फाईल तर मंजूर झाली असून त्यावर उपशहर रचनाकार नारायण भोसले यांना सही करायला वेळ मिळालेला नाही. त्यांच्या टेबलवर फाईल असूनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सोमवारी (दि. २४) मोरे यांनी भोसले यांना फोन केला. त्यावेळी मोरे यांना मंगळवारी सकाळी अकरा वाजता कार्यालयात येण्यास सांगण्यात आले.ठरलेल्या वेळेनुसार मोरे नगररचना विभागाच्या राजारामपुरी येथील कार्यालयात पोहोचले. त्यावेळी भोसले कार्यालयात नव्हते. चौकशी केली तर ‘साईटवर गेलेत’ एवढेच मोघम उत्तर मिळाले. मोरे यांनी त्यांना फोन केला; पण त्यांनी तो उचलला नाही.
अर्धा-पाऊण तास वाट पाहूनही भोसलेंचा काहीच निरोप मिळत नाही म्हटल्यावर मोरेंचा राग अनावर झाला. त्यांनी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आणि टाळे ठोकले.
दरम्यान, कर्मचाऱ्यांपैकी कोणीतरी ही बातमी भोसले यांना कळविली. तेव्हा त्यांनी मोरेंशी फोनवर चर्चा करून मी येत असल्याचा निरोप दिला. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून मोरे यांनी स्वत:हून टाळे खोलले. मात्र त्यांनी भोसले यांच्या कार्यालयातच ठाण मांडले. दुपारी दीड वाजता झालेल्या चर्चेत लवकरच फाईल क्लीअर केल्या जातील, असे भोसले यांनी सांगितले.
नारायणा, एकदाचा पाव रे!नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. जेव्हा नंदकुमार मोरे यांनी कार्यालयास टाळे ठोकले तेव्हा अनेक नागरिकही त्यांच्यासोबत राहिले. त्यांनी त्यांच्या कृतीचे समर्थन केले. काही नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
कोणी एक वर्षापासून, तर कोणी दोन वर्षांपासून या कार्यालयात चकरा मारत आहेत. कार्यालयास लिफ्ट नसल्यामुळे अनेक नागरिकांना जिने चढताना ‘नारायण’ आठवतो; पण जिने चढून गेल्यावर मात्र ‘नारायण’ काही भेटत नाही.
विनोद पांचाळ नावाचे एक अभियंता असून ते गेल्या तीन महिन्यांपासून कामावर नाहीत, असे सांगण्यात आले. त्यांचा कार्यभार कोणाकडे देण्यात आला नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
वयस्कर मंडळी तर कार्यालयात धापा टाकात जिने चढून वर येतात. तासन्तास अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करतात, अधिकारी भेटले नाही की पुन्हा दुसऱ्या दिवशी चकरा मारतात. त्यांच्या तोंडून एकच विनंती बाहेर पडते ती अशी, ‘.... नारायणा, एकदाचा पाव रे बाबा!’