कोल्हापूर : भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् हे सोमवार दि. ४ जून रोजी कोल्हापुरात येत असून सायंकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये त्यांचे व्याख्यान होणार आहे. कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, संजय शेटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.‘राष्ट्रीय अर्थव्यवस्था-सध्यस्थिती आणि परिणाम’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. विविध क्षेत्रातील अभ्यासू व मार्गदर्शकांच्या ज्ञानाचा आपल्या विभागातील उद्योग, व्यापार क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांना फायदा व्हावा यासाठी चेंबर्सच्यावतीने विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणुन पी. चिदंबरम् यांचे व््याख्यान घेण्यात आल्याचे गांधी यांनी सांंगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नोटाबंदीपासून जीएसटीपर्यंत जे अनेक निर्णय घेतले त्याबाबत आणि झालेल्या परिणामांबाबतचे विश्लेषण पी. चिदंबरम् त्यांच्या या व्याख्यानात करतील. पत्रकार परिषदेत चेंबर्सचे संचालक आनंद माने, प्रदीप कापडिया यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते.
विद्यमान अर्थमंत्र्यांशी चर्चाचारच दिवसांपूर्वी ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. जीएसटी परताव्याबाबतच्या अडचणींबाबत यावेळी चर्चा झाली. स्वतंत्र कॅम्प घेऊन या अडचणी सोडवण्याबाबत अर्थमंत्र्यांनी निर्देश दिल्याचे गांधी यांनी यावेळी सांगितले.