अभय व्हनवाडे
रूकडी/ कोल्हापूर : माने गटाला रिचार्ज करण्याकरिता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मातोश्री व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा, माजी खासदार निवेदिता माने याही आता निवडक कार्यकर्त्यांसह मुंबई येथे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत, उद्या दि. 15 रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघ हा माने गटाचा पारंपारिक मतदार संघ असताना येथे सातत्याने माने गटाला डावलण्यात येत असल्याने माने गट शिवसेनेचा मार्गावर आहे. गत लोकसभा निवडणूकीत धैर्यशील माने यांना राष्ट्रवादीच्या गोटातून विधानपरिषद सदस्यपद देण्याचा शब्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला होता, पण आमदारकी तर राहूदेच पक्षांतर्गत माने गटाचे गळचेपी करण्यात आली.
त्यातच माजी खासदार निवेदिता माने यांच्या स्नुषा वेदतिंका माने यांना खुद्द घरचे मैदान असलेला रूकडी जिल्हा परिषद मतदार संघात पराभव स्विकारावा लागला होता. हा पराभव करण्याकरिता जिल्हातील एका बडय़ा नेत्याने जोरदार फिल्डींग ही लावल्याची चर्चाही होती, याचाही राग माने गटांस होता.
राष्ट्रवादीत माने गटाला अंतर्गत कलह ; व त्यातच आघाडी अंतर्गत हातकणंगले हा लोकसभेचा मतदार संघ राष्ट्रवादीचा असताना तो मतदार संघ खासदार राजू शेट्टीकरिता सोडण्यात येणार असल्याने माने गटाची अस्वस्थता वाढली होती.
शेट्टी व माने गट हे पांरपारिक राजकीय विरोधक असलयाने व शेट्टीशी राष्ट्रवादीशी सोयरीक असल्याच्या नाराजीतून माजी जि.प. उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्या पाठोपाठ आता माजी खासदार निवेदिता माने याही शिवसेनेच्या वाटेवर आहेत.