कोल्हापूर : अयोध्येतील राममंदिराची सहा डिसेंबरनंतर पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी केली जाईल, असे राममंदिर न्यास कमिटीचे अध्यक्ष स्वामी रामविलास वेदांती यांनी गुरुवारी येथे सांगितले.कणेरी (ता. करवीर) येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे आयोजित सिद्धगिरी कारागीर महाकुंभाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष स्वामी रामविलास वेदांती म्हणाले, राममंदिराची पायाभरणी सहा डिसेंबरनंतर पंतप्रधानांच्या हस्ते केली जाईल. एक करोड ८१ लाख ६० हजार ६५ वर्षांपूर्वी राममंदिर अस्तित्वात होते. याबाबतचे पुरावे दिले आहेत.
सिद्धगिरी मठामध्ये आल्यानंतर जुन्या गावांची आठवण होते. अशा पद्धतीने गावांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. सिद्धगिरी कारागीर महाकुंभामध्ये देशातील विविध कारागिरांच्या कलांचे दर्शन घडले. गोमूत्रातून सोने मिळविण्यासारखे अनोखे प्रयोग या महाकुंभात मला पाहायला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिद्धगिरी मठातून निश्चितपणे उत्साह वाढविणारे विविध उपक्रम मिळतील. त्यासाठीच आपण लवकरच त्यांना सिद्धगिरी मठात येण्याचे आग्रही आमंत्रण देणार आहे. त्यासह देशाच्या कानाकोपऱ्यांतील विविध कारागिरांच्या कला जपण्यासह त्यांना बळ देणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने कारागीर मंत्रालय स्थापनेसाठी प्रयत्न करणार आहे.