कोल्हापूर : साडेसात लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी संशयित आरोपीला मुंबईहून बेळगावकडे कारमधून तपासासाठी आणत असताना पुणे-बंगलोर महामार्गावरील कागलजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात चालक ठार झाला, तर मार्केट पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलसह चौघे जखमी झाले.
राजू (वय ४० ,पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे मृताचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल असीर अहमद मेहबूब जमादार (३६), आर. एम. कनकरेड्डी (३८), विश्वनाथ बी. माळगी (सर्व रा. बेळगाव) व संशयित आरोपी नूर गुलाब शेख (२३, मूळ रा. काकती, बेळगाव, सध्या रा. अंधेरी, मुंबई) असे जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) उपचार सुरू आहेत. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.याबाबत सीपीआरमधून मिळालेली माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी चोरीची घटना काकतीमध्ये घडली होती. या गुन्ह्याप्रकरणी संशयित नूर शेख याला ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी (दि. २५) सकाळी मार्केट पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल असीर जमादार, विश्वनाथ माळगी, आर. एम. कनकरेड्डी आणि चालक राजू (पूर्ण नाव माहीत नाही) असे चौघेजण मुंबईला कारमधून गेले.
रात्री ते मुंबईत पोहोचले. शुक्रवारी (दि. २६) दुपारी नूर शेख याला अंधेरीमधून ताब्यात घेऊन हे सर्वजण निघाले. त्यांची कार पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागलजवळ रात्री एक वाजण्याच्या सुमारास आली असता दुभाजकाला जोराने धडकली. त्यात कारमधील चालक राजू हे जागीच ठार झाले, तर कॉन्स्टेबल असीर जमादार, कनकरत्न, माळगी आणि नूर शेख असे चौघे जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेमधून सीपीआरमध्ये आणण्यात आले. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले.संशयित नूर शेख याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याचे मोबाईल कॉल डिटेल्स (सीडीआर) मिळाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस मुंबईला गेले होते. पाच वर्षे शेख याठिकाणी वास्तव्य करीत असल्याचे असीर जमादार यांनी पत्रकारांना सांगितले.