कोल्हापूर : एटीएम कार्डचा गोपनिय पिनकोड दोघा तरुणांनी चोरुन दसरा चौकातील राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम सेंटरवरुन परस्पर ३६ हजार रुपये काढून कोषागार कार्यालयातील वरीष्ठ लिपीकाची फसवणुक केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. याप्रकरणी लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात दोघा अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल झाला.अधिक माहिती अशी, मांगीलाल काळु बागुल (वय ४८, रा. कावळा नाका) हे लक्ष्मीपूरी येथील कोषागार कार्यालयात वरीष्ठ लिपीक म्हणून नोकरी करतात. शुक्रवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास बागुल हे दसरा चौकातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. याठिकाणी नागरिकांची गर्दी होती.
एटीएम मशिनमधून पैसे काढत असताना बागुल यांच्या पाठोपाठ दोन तरुण आले. त्यांनी आम्हाला टीडीएम मशिनद्वारे पैसे भरायचे आहे, असे सांगितले. यावेळी बागुल यांनी मशिन बंद असल्याचे सांगताच ते दोघे त्यांच्या पाठिमागेच उभे राहिले.
पैसे काढून बागुल कार्यालयात आले. त्यानंतर काही वेळानंतर खात्यावरील ३६ हजार रुपये काढल्याचा मॅसेज मोबाईलवर आला. त्यांनी तत्काळ बँकेत येवून चौकशी केली असता थोड्यावेळापूर्वी एटीएमवरुन पैसे काढल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले.
आपली फसवणुक झालेचे लक्षात येताच त्यांनी लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीसांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यावरुन त्या दोघा चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी सावंत करीत आहेत.