कोल्हापूर: थंडीने जाता-जाता तडाखा देण्यास सुरुवात केल्याने कोल्हापूर पुन्हा एकदा गारठले आहे. कोल्हापुरात तापमानाचा पारा १३ ते १४ अंशांपर्यंत खाली गेला आहे. विशेष म्हणजे रात्री दहानंतर गारठा जास्त वाढत आहे. आभाळ निरभ्र असल्याने कडक ऊन असले तरी गार हवेमुळे उन्हाचा तडाखा फारसा जाणवत नाही.
कोल्हापुरात गेल्या आठवड्यात थंडीने पुनरागमन केले. पण दोन दिवसांपूर्वी पुन्हा ढगाळ वातावरण झाल्याने थंडी गायब झाली होती. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने या दोन दिवसात पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला होता, तथापि हा कमी दाबाचा पट्टा पूर्णपणे निवळल्याने वातावरण पुन्हा एकदा कोरडे झाले आहे. त्यामुळेच थंडीने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली. तापमानाचा पारा कमाल ३० तर किमान १४ अंशापर्यंत आला आहे. थंडी परतल्याने जनजीवन गारठल्याचे दिसत आहे. साधारणपणे ही परिस्थिती पुढील आठवड्यातील शनिवारपर्यंत राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. थंडीमध्ये दवाचेही प्रमाण जास्त असल्याने शाळू, गहू, हरभऱ्यासह भाजीपाल्याच्या पिकासाठी खूपच पोषक वातावरण आहे.
दरम्यान, आता दोन दिवस कमाल तापमान ३० ते ३२ अंशांपर्यंत राहणार असले तरी त्यानंतर मात्र ते ३५ ते ३७ अंशापर्यंत वाढत जाणार आहे. त्यामुुळे रात्री थंडीचा आणि दिवसा उन्हाचा तडाखा अनुभवण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे.