कोपार्डे : सध्या कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याची उंची वाढवू नये याबाबत दोन वेळा निवेदन दिले आहे. मात्र याची दखल राष्ट्रीय महामार्ग विभागाने न घेता काम सुरू केल्याने सोमवारी वाकरे, खुपिरे ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले.कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता कॉंक्रिटचा होणार आहे. यासाठी तीन फूट जाडीचे काँक्रीट टाकण्यात येणार आहे. यामुळे रस्त्याची उंची तीन फुटांनी वाढणार आहे. या मार्गाचे काम सुरू झाले असले तरी सेवा मार्ग अथवा रस्त्यावरील गावातील नागरिकांना मुख्य मार्गावर येण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसून येत नाही. तसेच बालिंगा पूर्व-पश्चिमेला दोनवडे या ठिकाणी चार मोऱ्या कराव्या, अशी मागणी केली आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष करून काम सुरू ठेवल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.याबाबत चंद्रकांत पाटील वाकरे म्हणाले, रस्त्याची उंची तीन फुटांनी वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. तसेच पुराच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. रस्त्याची उंची वाढवू नये, अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही पुन्हा काम बंद पाडू, असा इशारा दिला.यावेळी चंद्रकांत पाटील, उपसरपंच धनाजी पाटील, खुपिरे संजय पाटील, उपसरपंच सागर पाटील, सदस्य विजय पाटील, सचिन कुंभार, युवराज पाटील, संग्राम मोरे, शुभम चौगले, विक्रम सुतार उपस्थित होते.
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे काम बंद पाडले; चुकीच्या कामामुळे वाकरे, खुपिरे ग्रामस्थ आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 1:16 PM