कोल्हापूर : माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची धार आणखी वाढू लागली आहे. गुरुवारी शहरातून मालाची ने-आण करणाऱ्या अनेक टेम्पोंच्या चाकांतील हवा सोडून आंदोलकांनी त्या चालकांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. हे आंदोलन लवकर न मिटल्यास अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवू शकतो, असे व्यापाºयांकडून सांगितले जात आहे.गेल्या सहा दिवसांपासून जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या झेंड्याखाली सर्व वाहतूक संघटनांनी देशव्यापी चक्का जाम आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यामुळे शहरातील मालवाहतूक बंद झाली आहे. त्यात गेले सहा दिवस छोट्या टेम्पोंतून साठा केलेला माल गोडावून ते व्यापाऱ्यांचे दुकान इथपर्यंत नेला जात होता. मात्र, गुरुवारी आदर्श टेम्पो युनियनने आंदोलनास पाठिंबा व्यक्त केल्यानंतर टेम्पोंमधून होणारी वाहतूकही रोखण्यात आली.
दिवसभरात मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोंमधीलही वाहतूक रोखली जात होती; तर गाडी जाग्यावरच थांबून राहावी याकरिता आंदोलक पुढील चाकांतील हवा सोडत होते. यासह त्या चालकाने आंदोलनात सहभागी व्हावे, म्हणून त्याला गुलाबपुष्पही दिले जात होते.दरम्यान, लॉरी आॅपरेटर्सच्या पदाधिकाऱ्यांनी उजळाईवाडी येथील प्रवीण पेट्रोल पंप येथे गेल्या दोन दिवसांपासून लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे. यासह प्रबोधन करण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उजळाईवाडी ते निपाणी या राष्ट्रीय महामार्गावरून फेरी मारत अनेक ठिकाणी मालवाहतूकदारांचे प्रबोधन केले.
संपाचा परिणाम म्हणून पालेभाज्या, कडधान्ये यांचे दरही वाढू लागले आहेत; तर शहराला गॅस सिलिंडरचा पुरवठा मिरज येथील गॅस कंपन्यांतून सुरळीतपणे सुरू आहे. महामार्गावरील मालवाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे अवजड वाहनांची ये-जा अत्यल्प प्रमाणात दिसत आहे. याचा फायदा प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना होऊन त्यांना विनाअडथळा कमी अवधीत इप्सित स्थळी पोहोचता येत आहे.