कोल्हापूर : चिमुकल्यांची संकल्पना व खाऊचा पैसा, तसेच युवकांची साथ यातून कोल्हापूर येथील विद्या कॉलनीमध्ये सहा हजार चेंडू व सहा हजार फुगे यापासून बनविण्यात आलेला व लहानग्यांचे आकर्षण असलेली डोरेमॉनची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरत आहे. डोरेमॉनची प्रतिकृती पाहण्यासाठी तसेच फोटो काढण्यासाठी मुलांची मोठी गर्दी होत आहे. येथील अक्षय मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे हा आगळा-वेगळा गणपतीराया साकारून आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी व हस्तकलेतून वेगळा ठसा उमटविणारे तसेच जनजागृती करण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या अक्षय मित्रमंडळाच्या सदस्यांनी यंदाही डोरेमॉनची प्रतिकृती साकारून भाविक तसेच चिमुकल्यांचे लक्ष वेधले आहे.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही अक्षय मित्रमंडळांने गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम जंगलमय परिसरातील अतिमागास, विकासापासून वंचित असलेल्या आदिवासी बंधू-भगिनींसाठी एक ट्रक कपडे भरून पाठविण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सोशल मीडिया तसेच फलक लावून येथे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तसेच पोलीस निरीक्षक संजय मोरे व पोलिसांचे सहकार्य मिळत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सामाजिक उपक्रम राबविणाºया मंडळाने सामाजिक उपक्रम तसेच गडचिरोली येथे कपडे देण्याविषयीची संकल्पना मांडली. त्याला प्रतिसाद म्हणून काही मंडळांनी साथ दिली.
अक्षय मित्र मंडळानेही या आवाहनाला प्रतिसाद देत चांगला पुढाकार घेतला आहे. आजपर्यंत या मंडळातर्फे ‘लेक वाचवा, स्त्रीभ्रूण हत्या’विषयी जनजागृती तसेच ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा उपक्रम राबविताना ग्रीन व्हॅलेटिअर्स या संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून आतापर्यंत २०० झाडे लावली असून, दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना त्यास पाणी घालण्याचे काम करीत असल्याचे अध्यक्ष संगीत खोत व संयोजक प्रमोद देसाई यांनी सांगितले. सर्व सदस्य व पदाधिकारी व लहान मुले यासाठी दरवर्षी मेहनत घेत असल्याचेही ते म्हणाले.
यावर्षी अक्षय मित्र मंडळातर्फे कार्यक्रम पत्रिका काढताना त्यामध्ये शासनाच्या आरोग्यविषयी योजनांची माहिती, शस्त्रक्रिया व त्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्या मोफत पद्धतीने कशा राबविल्या जातात याची माहिती दिली आहे.