कोल्हापूर : राजारामपुरीत गणेशोत्सव मंडळाचा सेट कोलमडला, आरतीवेळी भार न पेलवल्याने दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:35 PM2018-09-20T12:35:09+5:302018-09-20T12:39:18+5:30
गणेशोत्सवाचा उत्साह हळूहळू वाढत असतानाच कोल्हापुरात राजारामपुरी १०व्या गल्लीतील एका गणेशोत्सव मंडळाने केलेल्या गोल्डन पॅलेस देखाव्याचा सेट कोलमडला. त्यामुळे पळापळ झाल्याने गोंधळ उडाला.
कोल्हापूर : गणेशोत्सवाचा उत्साह हळूहळू वाढत असतानाच कोल्हापुरात राजारामपुरी १०व्या गल्लीतील एका गणेशोत्सव मंडळाने केलेल्या गोल्डन पॅलेस देखाव्याचा सेट कोलमडला. त्यामुळे पळापळ झाल्याने गोंधळ उडाला. इंद्रप्रस्थ तरुण मंडळ असे या मंडळाचे नाव असून, मंडळाच्या गणेशोत्सवात एका वाहिनीवरील मालिकेचे कलाकार आरतीसाठी एकाचवेळी सेटवर चढल्याने हा प्रकार घडला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजारामपुरी १०व्या गल्लीतील इंद्रप्रस्थ तरुण मंडळाने गणेशोत्सवाचा मंडप उभारला असून, त्यामध्ये दोन फूट उंचीवर स्टेज करून त्यावर भव्य असा गोल्डन पॅलेसचा सेट उभारला आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास झी युवा या दूरचित्रवाहिनीवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेतील मानस वैदेही म्हणजेच हृता दुर्गुळे, यशोमान आपटे आणि मीरा म्हणजेच विवेक सांगळे आणि खुशबू तावडे हे कोल्हापुरात गणपती मंडळांना भेटी देण्यासाठी आले होते.
त्यावेळी हे सर्व कलाकार राजारामपुरीतील इंद्रप्रस्थ मंडळाच्या गोल्डन पॅलेस सेटवर गणपती देवाची आरती करण्यासाठी चढले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या चाहत्यांनीही सेटवर गर्दी केली. सेटवर तुंबळ गर्दी वाढली, त्याचा भार न पेलवल्याने सेट कोलमडला. त्याचवेळी सर्व सेट पडल्याच्या भीतीने घाबरून सर्व कलाकार, कार्यकर्ते व नागरिकांची पळापळ झाली. एकच गोंधळ उडाला.
सुदैवाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिस्थिती हाताळली, अन्यथा गोंधळात अनर्थ घडला असता. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी येऊन सर्व कलाकारांना सुरक्षित ठिकाणी हलविले.