कोल्हापूर : झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील पसार व संशयित मुख्य सूत्रधार बालाजी गणगे (रा. पुणे) याच्या पुण्यातील निवासस्थानावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून झाडाझडती घेतली; पण, तो मिळाला नाही.
या फसवणुकीची व्याप्ती मोठी असून आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे दोन कोटींची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. ‘झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सी’ या डिजीटल कंपनीची सुरुवात मुंबईतून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
चार दिवसांपूर्वी झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीच्या फसवणूक प्रकरणाचा पर्दापाश कोल्हापूर पोलिसांनी केला. या प्रकरणी संशयित राजेंद्र नेर्लेकर, त्याचा भाऊ अनिल व संजय तमन्ना कुंभार हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्याचा मुख्य सूत्रधार संशयित बालाजी गणगे असल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी पुण्यातील त्याच्या निवासस्थानावर छापा टाकून झाडाझडती घेतली.
संशयित राजेंद्र नेर्लेकर हा ग्राहक आणत असे तर त्याचा भाऊ अनिल रकमेचे आॅनलाईन व्यवहार करत. संजय कुंभार हा कंपनीचे व्यवस्थापन पाहत. पोलिसांनी संशयितांचे रेकॉर्ड जप्त केले आहे तसेच त्यांच्याकडून संगणकही जप्त केला आहे. पण, संगणकाचा पासवर्ड माहीत नसल्याने त्या संगणकामधील माहिती पोलिसांना मिळालेली नाही.
त्यामुळे सायबर क्राईम सेलकडून त्याचा पासवर्ड काढण्याचे काम सुरू आहे. पासवर्ड निघाल्यास संगणकातील डाटा पोलिसांना उपलब्ध होणार आहे. राजेंद्र नेर्लेकर याची पत्नी पद्मा, मुलगा बालाजी यांच्याकडे पोलीस चौकशी करत आहे.दरम्यान, संशयित राजेंद्र नेर्लेकर, संजय कुंभार व बालाजी गणगे या तिघांनी भागीदारीमध्ये ही कंपनी काढली. त्याचा शुभारंभ मुंबईत त्यांनी केला. या शुभारंभावेळी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केल्याचीही माहिती तपासात पुढे येत आहे.