ठळक मुद्देगडहिंग्लजला काळभैरी मंदिरात चोरी ५ लाखाच्या दागिण्यांसह रोकड लांबवली चोरटे ‘सीसीटीव्ही’ कैद
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरापासून ६ किलोमीटर अंतरावरील श्री काळभैरी डोंगरावरील मंदिरातील सुमारे ५ लाखाचे दागिने आणि दानपेटीतील पैशावर गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. मंदिरातील ‘सीसीटीव्ही’च्या कॅमेऱ्यातील या घटनेतील तीनही अज्ञात चोरटे कैद झाले आहेत. या प्रकारामुळे गडहिंग्लजसह सीमाभागातील नागरिकांत खळबळ उडाली आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरूवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाजा कडी कोयंडा तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी देवाच्या मागील बाजूच्या चांदीच्या प्रभावळीचा कांही भाग तोडून घेतला. तसेच देवाच्या हातातील चांदीची तलवार, त्रिशूल, राजदंड, छडी व जोगेश्वरी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि गाभाऱ्यातील लोखंडी कपाटातील किरीट-कुंडल, पादुका, मुखवटे, चिलीम, नागमूर्ती आदी दागिन्यांसह दोन दानपेट्यातील रोकड लांबविली.
श्री काळभैरव मंदिरातील ‘श्रीं’च्या मूर्तीसाठी भाविकांच्या देणगीतून तयार करून बसविण्यात आलेली १६ किलो चांदीची प्रभावळीतील कांही भाग अज्ञात चोरट्यांनी असा कापून नेला आहे. (मज्जीद किल्लेदार)आदल्या दिवशी गुरूवारी सायंकाळी मंदिरात ‘रेकी’ करूनच चोरी केल्याचा कयास आहे. चोरांच्या तपासासाठी फिरविण्यात आलेल्या श्वानाने मंदिराच्या पश्चिमेकडील हडलगे बसथांब्यापर्यंत माग दाखविला आहे.
चोरट्यांनी विस्कटलेली मंदिरातील कपाटातील साहित्य. (मज्जीद किल्लेदार)
फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरील ठस्से घेतले आहेत. गुन्हा अन्वेषण पथकासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस अधिक तपास करीत आहेत.