कोल्हापूर : गॅस सिलिंडरच्या दरात आॅगस्ट महिन्यात ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. यामुळे ग्राहकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरानुसार गॅस सिलिंडरचे भाव ठरत असतात. ते दर महिन्याला बदलत असतात. त्यानुसार या महिन्यातही दर बदलले असून, गत महिन्याच्या तुलनेत या महिन्यात दरात ३६ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना या महिन्यात सबसिडी धरून ७७६ रुपये ५४ पैसे दराने सिलिंडर विकत घ्यावे लागणार आहे.
या सिलिंडरसाठी २७५ रुपये २९ पैशांची सबसिडी ग्राहकांच्या खात्यावर जमा होणार आहे. गेल्या तीन महिन्यांत गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात ५६ रुपयांची, जून महिन्यात ४८ रुपयांची वाढ झाली आहे.
दर महिन्याला होणाऱ्या दरवाढीने ग्राहकांची तारांबळ उडून महिन्याचे बजेट कोलमडले आहे. सबसिडीचे पैसे ग्राहकाच्या बॅँक खात्यावर जमा होत असले तरी सिलिंडर खरेदी करताना संपूर्ण रक्कमच अदा करावी लागते; त्यामुळे याचा फटका सर्वांना बसत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या कच्च्या तेलाच्या दरानुसार गॅस सिलिंडरचे भाव ठरतात. त्यानुसार गॅस कंपन्या महिन्याच्या एक तारखेला आॅनलाईनद्वारे हे दर संबंधित गॅस वितरकांना कळवितात. त्याप्रमाणे एप्रिल महिन्यात सबसिडीसह गॅस दर ६३७ रुपये होता. त्यामध्ये मे महिन्यात दोन रुपयांनी वाढ होऊन हा दर ६३९ रुपये झाला.
जून महिन्यातील दर ६८५ होता, तो जुलै महिन्यात ७४१ वर जाऊन पोहोचला; तर आॅगस्टमध्ये हा दर ७७६ रुपये ५६ पैसे झाला आहे. दिवसेंदिवस हे दर कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. याचा फटका विशेषत: महिलांना बसत आहे; कारण दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि त्यातच ही दरवाढ यांमुळे पैशाचा मेळ कसा घालायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने आता महिलांना मातीच्या चुली द्यावात.- रूपाली पाटील, गृहिणी
गॅस दरवाढ ही सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक आहे. देशात गॅसचे उत्पादन मुबलक असल्याचे पंतप्रधान सांगतात; तर दुसऱ्या बाजूला दर मात्र गगनाला भिडतात, हा विरोधाभास आहे. गॅस ही अत्यावश्यक वस्तू असल्याने तिचे दर सर्वसामान्यांना परवडतील, असेच असावेत.- अरुण सावंत, सर्वसामान्य नागरिक