सचिन भोसलेकोल्हापूर : राज्य शासनाने राष्ट्रीय, खेलो इंडिया, आशियाई, ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उज्वल करण्यासाठी खेळाडूंना केंद्रबिंदू मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रीत “मिशन लक्ष्यवेध” आराखडा क्रीडा विभागाने तयार केला आहे. यात जिल्हास्तरावर १३८ क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरसाठीकुस्ती, नेमबाजी आणि फुटबाॅल केंद्र सुरू केली जाणार आहेत. यात प्रत्येकी पन्नास खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे.या आराखड्यानुसार प्रथम टप्प्यात १२ खेळ निश्चित केले असून, यामध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या खेळांचा समावेश आहे. या खेळांची हाय परफॉर्मन्स सेंटर राज्यात विविध ठिकाणी सुरू केली जाणार आहेत. यासह विभागीयस्तरावर ३७ स्पोर्टस एक्सलन्स सेंटर व जिल्हास्तरावर १३८ क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांची स्थापना केली जाणार आहे.जिल्हा विकास आराखडा तयार करून १० टक्के निधी क्रीडा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्याद्वारे खेळाडूंना करिअरच्या संधीची माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण केंद्र व इतर सुविधांकरिता जिल्हास्तरावर अंदाजे ५५ कोटी अंदाजित खर्च आहे. या योजनेच्या संनियंत्रणसाठी क्रीडा युवक सेवा संचालनालयाचे रुपांतर करून महाराष्ट्र क्रीडा प्राधिकरण असे केले जाणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलात कुस्ती, नेमबाजी या खेळासाठी प्रत्येकी ५० खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. यातूनही जे खेळाडू चांगली कामगिरी करतील, अशा १० खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शनही पुरविले जाणार आहे.
फुटबाॅलसाठी केंद्र होणारदेशातील तिसरी फुटबाॅल पंढरी म्हणून देशभरात कोल्हापूरच्या स्थानिक फुटबाॅल स्पर्धा आणि येथील फुटबाॅलप्रेमींची ख्याती आहे. फुटबाॅल हंगाम आणि खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या व एकूण वातावरणाचा विचार करून येथे दुसऱ्या टप्प्यात फुटबाॅल केंद्रही स्थापन केले जाणार आहे. यात पन्नास विद्यार्थी खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. जे चमकदार कामगिरी करतील, त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी देशासह परदेशातही पाठविले जाणार आहे.
क्रीडा उपसंचालकांचा पुढाकारमहाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीयसह आशियाई, ऑलिम्पिकमध्ये चमकावेत. यासाठी मिशन लक्ष्यवेधची संकल्पना कोल्हापूरचे तत्कालीन क्रीडा उपसंचालक व संध्या क्रीडा विभागाचे (आस्थापना) उपसंचालक असलेले संजय सबनीस यांनी राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे संकल्पना मांडली. ती मंत्री बनसाेडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केली. त्यांनाही आवडली आणि त्यांनी थेट मंत्रिमंडळात मंजुरी दिली. त्यानुसार राज्यभारत ही केंद्रे होणार आहेत.