कोल्हापूर दि. 2 : स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेवदंडा, जिल्हा अलिबाग येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आज शासकीय कार्यालयांच्या आवारात व शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरातील तसेच करवीर, शिरोळ, राधानगरी, भुदरगड, शाहुवाडी, पन्हाळा, कागल, गगनबावडा आणि हातकणंगले अशा नऊ तालुक्यात स्वच्छता मोहिम हाती घेवून शासकीय कार्यालयांचा परिसर, रेल्वे स्थानक स्वच्छ करण्यात आला. आजच्या स्वच्छता मोहिमेत प्रतिष्ठानच्या वतीने शहर व जिल्ह्यातील सुमारे 100 टन कचरा संकलित करुन त्यांची निर्गती करण्यात आली.
या मोहिमेत तीन हजारहून अधिक सदस्यांनी सहभाग घेवून कोल्हापूर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता मोहिम यशस्वीपणे राबविली. यामध्ये जवळपास 70 किमी लांबीचे रस्ते आणि 5 लाख 2 हजार 984 चौरस मिटर क्षेत्रातील कचरा गोळाकरुन त्याची निर्गती करुण्यात आले. तसेच कोल्हापूर व हातकणंगले रेल्वेस्थानकाचीही स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता मोहिम राबवून स्वच्छतेचा प्रारंभ स्वत:पासून करण्याबाबत प्रभावी जागृतीचे काम हाती घेतले आहे. अस्वच्छतेमुळे होणारे साथीचे रोग, पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचा प्रारंभ करावा ही प्रतिष्ठानची शिकवण मोलाची आहे. आपले घर, आपले गाव, आपले शहर, आपले कार्यालय, आपला रस्ता नेहमी स्वच्छ, सुंदर आणि नेटका ठेवण्यात सर्वांनीच सक्रीय सहभाग घेणे गरजेचे आहे. प्रतिष्ठानने यासाठी चालविलेले प्रयत्न महत्वाचे असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
स्वच्छता शिका - आरोग्याला जिंकाआजच्या स्वच्छता मोहिमेत प्रतिष्ठानच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वच्छतेच्या जनजागृती व प्रबोधनासाठी स्वच्छता विषयक घोषवाक्यांचे फलक मोहिमेच्या अग्रभागी ठेवले यामध्ये स्वच्छता शिका - आरोग्याला जिंका, स्वच्छता असे जेथे - आरोग्य वसे तेथे, प्लास्टिक हटवा - पर्यवरण वाचवा, स्वच्छ भारत - सुंदर भारत, स्वच्छता दारोदारी - आरोग्य घरोघरी, स्वच्छता असे जिथे जिथे - लक्ष्मी वसे तिथे तिथे अशा घोषवाक्यांचा समावेश होता.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आज कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेतून रस्ते, कार्यालये स्वच्छ केली. आजच्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, छत्रपती प्रमिलाराजे रुगणालय, न्याय संकूल, तहसिलदार कार्यालये, पोलीस अधीक्षक कार्यालय, उत्पादन शुल्क, अँटी करप्शन ब्युरो, प्रांताधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, वन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुरातत्व विभाग, उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, सिंचन भवन, बांधकाम भवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महानगरपालिका, महापालिकेचे शहरातील दवाखाने यांच्यासह शहरातील प्रमुख चौक व रस्ते स्वच्छ करण्यात आले, त्यामुळे संपूर्ण शहर आज चकाचक झाले.