- मारुती गुरवकोल्हापूर - शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी पैकी केदारलिंगवाडीच्या हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी ठार झाली. मनीषा बाबाजी डोईफोडे (वय १०, सध्या. रा. केदारलिंगवाडी, मूळ रा. पुसाळे, ता. शाहूवाडी) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. २१) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
शाहूवाडी तालुक्यातील पुसाळे येथील बाबाजी डोईफोडे हे गेल्या चार महिन्यांपासून कुटुंबासह उदगिरी पैकी केदारलिंगवाडी येथे राहत आहेत. त्यांची पत्नी आणि मुलगी बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जनावरांना चरण्यासाठी घेऊन निघाल्या होत्या. केदारलिंग वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर जनावरांच्या मागे असलेल्या मनीषा डोईफोडे या मुलीला बिबट्याने झडप मारून पकडले. काही अंतर पुढे गेल्यावर मुलीचा आवाज येत नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. आईने मुलीचा शोध सुरू केल्यानंतर काही अंतर मागे गवतात मुलीला ओढून नेणारा बिबट्या दिसला. आरडाओरडा करताच बिबट्या जंगलात पळून गेला.
माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याने मान पकडल्यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला. या परिसरात बिबट्यांची दहशत वाढली असून, त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. चांदोली अभयारण्यापासून जवळच हा परिसर असल्यामुळे बिबट्यांचा वावर वाढला आहे.