कोल्हापूर : जिल्ह्यातील आर्थिक दृष्टया मागास कुटुंबातील तसेच झोपडपट्टीतील मुलींच्या दातातील वाकडेपणा दुर करण्याबरोबरच दर सहा महिन्यांनी दातांचे मोफत क्लिनिंग करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यासाठी दहा डेंटीस्टची टिम तयार केली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.गणेशोत्सव काळात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टीतील मुलींच्या दातांचा वाकडेपणा दुर करण्यासाठी मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 31 मुलींची वैद्यकीय कक्षाकडे नोंद झाली असून त्यातील 18 मुलींच्या वाकड्या दातांवर शस्त्रक्रिया करुन क्लिप बसविण्यात आल्या आहेत.
या मुलींची तसेच त्यांच्या पालकांची येथील आयोध्या हॉटेल येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देवून या मुलींशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सौ. अंजली चंद्रकांत पाटील यांनी या मुलींसमवेत स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.आर्थिक दृष्टया मागास कुटुंबातील तसेच झोपडपट्टीतील मुलींच्या दातातील वाकडेपणा दुर करण्यासाठी जे जे काही करणे शक्य आहे ते सर्व करुन या मुलींचे दात निटनेटके केले जातील, अशी ग्वाही देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या मुलींच्या दातांवर शस्त्रक्रिया करुन दातांना क्लिप बसविण्याचे काम सिध्दगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या वतीने मानवतेच्या आणि सामाजिक भावनेतून पार पाडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या मुलींना आई-वडील या नात्याने आवश्यक ते उपचार आणि सुविधा विनामुल्य देण्यात पुढाकार घेतला जाईल, असेही ते म्हणाले.दातांची निगा राखून दात अधिक काळ टिकण्यासाठी वेळोवेळी दातांचे क्लिनिंग करुन घेणे गरजेचे असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, समाजात आर्थिक परिस्थिती तसेच कामाच्या व्यापामुळे दातांची निगा राखली जात नाही. त्यामुळे दातांचा वास येणे, दात खराब होणे या समस्या वारंवार उद्भवतात.
यासाठी मुलींच्या दातांची दर सहा महिन्याला क्लिनिंग करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यासाठी शहरातील दहा डेंटीस्टचे पथक तयार करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आर्थिक मागासवर्गातील तसेच झोपडपट्टीतील मुलींच्या दातांच्या क्लिनिंगसाठी पालकांनी कावळा नाका येथील पालकमंत्र्यांच्या कार्यालयातील वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी दातांचा वाकडेपणा दुर करण्यासाठी शस्त्रक्रिया करुन क्लिप बसविलेल्या मुलींनी तसेच पालकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या मानवतेच्या आणि सामाजिक भावनेतील उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
लक्षतीर्थ येथील श्रावणी यादव तसेच मंगळवार पेठेतील रुद्रहंस बाणदार तसेच पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी येथील अमृता पाटील या मुलींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने गरीब मुलींसाठी मुलींच्या दातातील वाकडेपणा दुर करण्यासाठी अतिशय महत्वाचा आणि जीवनाला कलाटणी देणारा उपक्रम हाती घेतला असून यामुळे दात ठिक झाल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी मुलींना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या.आयोध्या हॉटेल येथे आयोजित केलेल्या या सदिच्छा भेट कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अंजली चंद्रकांत पाटील, सिध्दगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविण नाईक, डेंटीस्ट डॉ. दिप्ती भिर्डी, पणनचे विशेष लेखा परिक्षक बाळासाहेब यादव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिक्कोडे, प्रसाद वळंजू, नितीन पाटील, अक्षय शिंदे आदी मान्यवर आणि दातांना क्लिप लावलेल्या मुली आणि पालक उपस्थित होते.