कोल्हापूर : नऊ वर्षे एक रूपयाही लाभांश न देता मोठ्या विश्वासाने संस्था जिल्हा बॅँकेच्या मागे हिमालयासारख्या उभ्या राहिल्या. त्यामुळेच बॅँकेला तोट्यातून बाहेर काढून ४ टक्के लाभांश देता आला. पुढील वर्षी शंभर कोटी नफ्याची उदिष्ट ठेवत असताना कर्मचाऱ्यांना बोनस व संस्था सभासदांना १२ ते १५ टक्के लाभांश देणार असल्याची ग्वाही जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.
जिल्हा बॅँकेशी संलग्न संस्थांना लाभांश प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम सोमवारी बॅँकेत झाला, त्यावेळी मुश्रीफ बोलत होते. यावेळी प्राधीनिधीक स्वरूपात पंचवीस संस्थांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, अडीच वर्षापुर्वी संचालकांनी बॅँकेची सूत्रे ताब्यात घेतली. संचालक मंडळाने अत्यंत पारदर्शक कारभार करत बॅँकेला पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला. नऊ वर्षे संलग्न संस्थांना लाभांश मिळाला नव्हता. यावर्षी ७४ कोटीचा संचित तोटा कमी करून १२ कोटीचा निव्वळ नफा झाला. त्यातून संस्थांना ४ टक्के लाभांश दिला.
अडचणीच्या काळात संस्था बॅँकेच्या मागे हिमालयासारख्या उभ्या राहिल्याने हे करणे शक्य झाले, त्याची जाणीव ठेवून पुढील वर्षी १५ टक्यापर्यंत लाभांश देण्याचा आमचा मानस आहे.बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बॅँकेचे ज्येष्ठ संचालक पी. एन. पाटील, निवेदिता माने, के. पी. पाटील, पी. जी. शिंदे, भैया माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विलास गाताडे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजू आवळे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, अशोक चराटी, राजेश नरसिंग पाटील, उदयानी साळुंखे, आर. के. पोवार, असिफ फरास आदी उपस्थित होते. व्यवस्थापक डॉ. ए. बी. माने यांनी आभार मानले.संचालकांच्या संस्थांचाच भरणा!वास्तविक ज्या संस्थांचे भागभांडवल अधिक आहे, त्यांचा सन्मान अपेक्षित होते. प्राधीनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र दिलेल्या मध्ये काही मोठ्या संस्था आहेत, पण त्यातील बहुतांशी संचालकांच्या गावातीलच आहेत.