कोल्हापूर : जिल्ह्यातील निराधार पात्र देवदासींना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती लाभ त्वरित मिळावा. याकरिता नेहरू युवा देवदासी विकास मंडळातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर देवदासींचा मोर्चा काढण्यात आला.जिल्ह्यात एकूण ६०० हून अधिक निराधार देवदासी आहेत. त्यांतील ३०० पात्र देवदासींना यापूर्वी निवृत्तिवेतनाचा लाभ मिळतो. मात्र, वेतन अल्प स्वरूपाचे आहे. उर्वरित ३२१ हून अधिक देवदासी पात्र असूनही त्यांना अद्याप संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही.
यासह घरकुल प्रस्ताव मंजुरीचे आश्वासन शासनाने दिलेले आहे. मात्र, अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या देवदासी, विधवा, वयोवृद्ध, निराधार यांना सध्या दरमहा ६०० अनुदान मिळत आहे.
या अनुदानात गेल्या १० वर्षांत कोणतीच वाढ झालेली नाही. प्रत्येक वर्षी यात वाढ व्हावी म्हणून अनेक वेळा निवेदन, अर्ज-विनंत्याही संघटनेमार्फत करण्यात आल्या. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासनांपलीकडे काहीच शासनाने दिलेले नाही.
यात वाढ करून ३००० रुपये अनुदान व्हावे. या मागण्यांचा विचार शासनाने करावा; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी स्वीकारले.मोर्चाचे नेतृत्व माजी नगरसेवक व मंडळाचे अध्यक्ष अशोक भंडारे, सचिव मायादेवी भंडारे यांनी केले. यावेळी देवाताई साळोखे, शांताबाई पाटील, रेखा वडर, द्रौपदी सातपुते, जमन्नवा वज्रमठ्ठी, शारदा पाटील, नसीम देवडी, सुलोचना व्हटकर, गयाबाई कडेक, पंकज भंडारे, शिवाजी शिंगे, शंकर कांबळे, अनिल माने, प्रसाद गायकवाड, बालाजी काळे, मालन आवळे, लक्ष्मी वायदंडे, यल्लवा कांबळे, लताबाई सकटे, नानीबाई कांबळे, अनिता कांबळे, आदी उपस्थित होते.