कोल्हापूर : निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या कार्यालयाला जागा देऊ व त्यांच्या अनुभवाचा फायदा पोलीस दलात नवीन रुजू झालेल्यांना होईल, असे मत नूतन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.कोल्हापूर जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या मासिक सभेत ते बोलत होते. निवृत्त संघटनेचे अध्यक्ष मदन चव्हाण अध्यक्षस्थानी होते. कसबा बावड्यातील पोलीस कवायत मैदानावरील अलंकार हॉलमध्ये ही सभा झाली.यावेळी अभिनव देशमुख म्हणाले, निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आम्हाला फायदा आहे. त्यांनी अनुभवाच्या जोरावर पोलीस दलात नवीन रुजू झालेल्यांना मार्गदर्शन करावे. त्यांना कायदेशीर बाबी, त्याची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करावे. त्यांच्या अनुभवाची शिदोरी आम्हाला मिळेल.यावेळी मदन चव्हाण यांनी, दक्षिण भारतात असणाऱ्या राज्यांमधील निवृत्त पोलिसांच्या संघटनेला त्या-त्या राज्यांनी २० कोटींचा निधी दिला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी केली. पंढरीनाथ मांढरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आनंदराव बोडके यांनी अहवाल वाचन केले.सभेला प्रभाकर पाटील, भारतकुमार राणे, बाळासाहेब गवाणी, लक्ष्मण हवालदार, अशोक पोवार, विष्णू कुंभार, परशुराम रेडेकर, अशोक पोवार, निर्मला बेंद्रे यांच्यासह निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विजय पाटील यांचा सत्कारकोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याचबरोबर ज्यांचे वाढदिवस असतात, त्यांचाही सत्कार करण्यात आला.