कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडियाच्या (एनएसयुआय) कोल्हापुरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरूवारी येथे केली.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत पात्र ठरलेल्या कोल्हापूर विभागातील १६,८९५ विद्यार्थ्यांना वर्ष संपले तरी अद्याप ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याबाबतचे ‘वर्ष संपले तरी १६ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हवेतच’ हे वृत्त ‘लोकमत’ ने दि. १६ जूनच्या अंकात प्रसिद्ध केले होते.
यावर ‘एनएसयुआय’ ने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना गुरूवारी निवेदन दिले. त्यांच्यावतीने तहसिलदार बिराजदार यांनी निवेदन स्वीकारले. अर्ज आॅनलाईन आणि आॅफलाईन मागविण्याच्या गोंधळाचा फटका शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना बसला आहे. शैक्षणिक वर्ष संपले, तरी त्यांना या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही.
या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या शिष्टमंडळात ‘एनएसआयुआय’ चे जिल्हाअध्यक्ष पार्थ मुंडे, आशुतोष मगर, सुशिल चव्हाण, वैभव देसाई, दस्तगीर शेख, किशोर आयरे, अक्षय शेळके, विनायक पाटोळे, सौरभ घाटगे, सुरेश साबळे, आदित्य डोंगळे, निखिल कांबळे, राकेश माळवी आदींचा समावेश होता.