कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या मल्टीस्टेट विषयाला विरोध करणारा ठराव बाचणी (ता. करवीर) येथील जोतिर्लिंग दूध संस्थेने केला आहे. तो दाखल करून घेण्यास संघाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत ‘गोकुळ’ ही जिल्'ाची अस्मिता आहे; ती पुसण्याचा उद्योग कोणी करू नये, असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सांगितले.‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटच्या विषयावरून सध्या सत्तारूढ व विरोधक आमनेसामने आले आहेत. हा वाद विकोपाला पोहोचण्याची शक्यता आहे. मल्टिस्टेटवरून दूध संस्थांमध्ये कमालीचा संभ्रम आहे. त्यामुळे काही संस्थांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. बाचणी येथील जोतिर्लिंग दूध संस्थेने मल्टिस्टेटला विरोधाचा ठराव केला आहे. तो घेऊन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव हे ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात शुक्रवारी गेले होते.
संघाचे मुख्य कार्यालय गोकुळ शिरगाव येथे असल्याने तिथे ठराव द्या, असे येथील प्रशासनाने सांगितले; पण सर्वसाधारण सभा येथे होते, मग ठराव का घेत नाही, असे जाधव यांनी सांगितले. तासभर तिष्ठत बसल्यानंतर जाधव यांचा ठराव घेण्यात आला. दरम्यान, जाधव यांनी मल्टिस्टेट विरोधाचा ठराव सहायक निबंधक (दुग्ध) यांनाही दिला.