कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या मल्टिस्टेट विषयाला कागल, शाहूवाडी व चंदगड तालुक्यांतील प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींना पाठिंबा जाहीर केला. दूध उत्पादकांच्या हितासाठी मल्टिस्टेट होणे गरजेचे असून, राजकीय द्वेषातून विरोध करणाऱ्यांकडे सभासदांनी लक्ष न देता संघ प्रशासनाच्या मागे ठाम राहावे, असे आवाहन तिन्ही तालुक्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आले.
बिद्री चिलिंग सेंटर येथे कागल तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी बोलताना संचालक रणजितसिंह पाटील म्हणाले, म्हैस दूधवाढीवर मर्यादा आल्याने संचालकांनी विचारांती मल्टिस्टेटचा निर्णय घेतला आहे. यामुळे दूध उत्पादक अथवा दूध संस्थांच्या हक्कावर कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही. अंबरीश घाटगे म्हणाले, वीस लाख लिटर दुधाचे लक्ष्य असल्याने मल्टिस्टेट गरजेचे आहे. यावेळी सभासदांनी हात उंचावून ‘मल्टिस्टेट’ला पाठिंबा दिला.
चंदगड तालुक्यातील बैठक माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाटणे येथे झाली. संचालक दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रताप सूर्यवंशी, बबनराव देसाई, नाना दशके, यशवंत सोनार, आर. जी. पाटील, एम. एन. पाटील, मारुती पटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सभासदांनी ‘मल्टिस्टेट’ला पाठिंबा दिला.ज्योती पाटील, विठाबाई मुरकुटे, मनीषा शिवणकर, शांताराम पाटील, शामराव बेनके, बाबूराव जाधव, गजानन ढेरे, नरसू पाटील, वसंत चव्हाण, आदी उपस्थित होते.
शाहूवाडी तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींची बैठक सरुड येथे झाली. यामध्ये सर्वांना हात उंचावून ‘मल्टिस्टेट’ला पाठिंबा दिला. आमदार सत्यजित पाटील म्हणाले, दूध संघ मल्टिस्टेट झाल्यास संघास फायदाच होणार असून संस्थांच्या प्रतिनिधींनी संघाच्या विस्तारासाठी, ‘अमूल’सारख्या बलाढ्य दूध संघाबरोबर स्पर्धा करण्यासाठी पाठिंबा द्या. मल्टिस्टेटच्या विषयावरून जे जिल्ह्यामध्ये राजकारण पेटविले गेले आहे, त्या राजकारणापासून दूध संघाला दोन हात लांब ठेवण्यासाठी सर्व सभासदांनी जागरूक राहावे. जिल्हा परिषदेचे सदस्य हंबीरराव पाटील, शाहूवाडी पंचायत समितीचे उपसभापती पांडुरंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नामदेव पाटील, विजय खोत, अमरसिंह पाटील, दिलीप पाटील, सुरेश पारळे, जालिंदर पाटील, तानाजी चौगुले, भीमराव पाटील, आदी उपस्थित होते.