कोल्हापूर : खंडणीच्या गुन्ह्यात अटक केल्याचा राग मनात धरून पोलिसांना धमकाविणाऱ्या गुंड योगेश राणे याच्यासह आठ साथीदारांना शनिवारी ‘मोक्का’ लावण्यात आला.
या टोळीच्या विरोधात खुनी हल्ला, खंडणी, फसवणूक, मारहाण, आदी गंभीर गुन्हे कोल्हापूरसह कऱ्हाड येथे दाखल आहेत. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी दोन टोळ्यांना ‘मोक्का’ लावण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.संशयित टोळीप्रमुख योगेश बाळासो राणे (वय ३४, रा. ई वॉर्ड, शाहूपुरी पाचवी गल्ली), आकाश आनंदा आगलावे (२५, रा. न्हाव्याचीवाडी-शिळोली, ता. भुदरगड), मारुती मधुकर कांबळे (२९, रा. निगवे खालसा, ता. करवीर), हृषिकेश राजेंद्र फुटाणकर (३१, रा. मालवे कॉलनी, सरवडे, ता. राधानगरी), विशाल बाजीराव पाटील (३१, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर), शेखर दत्तात्रय कुलकुटकी (२०, रा. शाहूनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
या सर्वांना अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये कारागृहात आहेत. सुशांत बाळासाहेब देसाई (रा. सोनाळी, ता. भुदरगड), प्रसाद सुरेश घाटगे (रा. शाहूनगर, कोल्हापूर) हे दोघे पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी कमिशन एजंट विजय निवृत्ती कांबळे (३८, रा. निगवे खालसा, ता. करवीर) यांचे अपहरण व मारहाण करून त्यांच्याकडून ७८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी गुंड योगेश राणेसह त्याच्या साथीदारांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती.
त्याच्यावर शाहूपुरी, जुना राजवाडा, हातकणंगले, भुदरगड, कऱ्हाड (जि. सातारा), आदी ठिकाणी हत्यार तस्करी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, फसवणूक, जुगार असे तेरा गुन्हे दाखल आहेत. त्याची टोळी शहरासह उपनगरांत कार्यरत आहे. त्याने चौकशीदरम्यान पोलिसांना ‘बघून घेतो,’ अशी धमकी दिली होती.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांनी संशयित राणे टोळीच्या विरोधात ‘मोक्का’ कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यास शनिवारीच मंजुरी दिल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.