कोल्हापूर : प्रसूतिक्षेत्रातील जे ज्ञान ‘गुगल’कडेही नाही, ते ज्ञान डॉ. सतीश पत्कींकडे आहे; म्हणूनच त्यांचे वंध्यत्व चिकि त्सेवरील हे पुस्तक देशभरातील डॉक्टर्स आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश भोंडे यांनी व्यक्त केला.येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांनी लिहिलेल्या वंध्यत्व चिकित्सेवरील सचित्र पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भोंडे यांच्या हस्ते झाले; त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भोंडे म्हणाले, पत्की यांना नावीन्याची आस आहे. त्यामुळे त्यांच्याकडे प्रश्नांची खाण आहे. ती उत्तरे शोधताना मी तरुण होतो; त्यामुळे मला कोल्हापुरात त्यांच्याकडे येणे आवडते. उत्तम डॉक्टर, उत्तम शिक्षक, उत्तम लेखक असे पत्की यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून, या त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय पुरुषांच्या वंध्यत्वाबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. केवळ व्यवसाय न करता संशोधनासाठीही डॉ. पत्की यांनी कोट्यवधी रुपयांची प्रयोगशाळा उभारली.डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, मी या कार्यक्रमाला एक डॉक्टर, पालक आणि प्रशासकीय अधिकारी या तिहेरी भूमिकांतून उपस्थित आहे. डॉक्टर आणि रुग्णांमधील नाते बदलत जात असताना हे नाते कसे असावे, यासाठी डॉ. पत्की हे एक आदर्श उदाहरण आहे. भारतासाठी हे संशोधन महत्त्वाचे असून, ते कोल्हापुरात झाले आहे आणि त्याचा देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना फायदा होणार आहे, याचा मला आनंद आहे. डॉ. पत्कींमध्ये कर्म, ज्ञान आणि भक्तीचा संगम झाला आहे.डॉ. सतीश पत्की यांनी, १९८२ साली ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय व्यवसायातील उमेदवारी ते या पुस्तकापर्यंतचा आपला प्रवास सांगितला. ते म्हणाले, ‘गोकुळ’च्या कृत्रिम रेतन प्रयोगातून प्रेरणा घेऊन मी कोल्हापुरात टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रयोगांना सुरुवात केली.
डॉ. पत्की यांच्यासह डॉ. उज्ज्वला पत्की, शरीरशास्त्रामध्ये आठ वर्षे कार्यरत असणाऱ्या डॉ. प्रिया पाटील यांनी हे पुस्तक तयार केले असून, अमेरिकेतील ‘क्लिवलँड क्लिनिक’ या जगप्रसिद्ध संशोधन संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या डॉ. श्वेता पत्की-कुलकर्णी व पॅथॉलॉजिस्ट डॉ. आर. एस. पाटील यांचे त्यासाठी विशेष सहकार्य लाभले आहे.
यावेळी डॉ. किरण पाटणकर आणि डॉ. अजय आडके यांचा सत्कार करण्यात आला. चारूदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
क्लिष्ट विषयाची सोपी मांडणीडॉ. पत्की यांनी यावेळी आढावा घेत असताना गर्भधारणा ते प्रसूती हा क्लिष्ट विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडला. जुळे आणि तिळ्यांचा मेळावा, पहिल्या टेस्ट ट्यूबचा कोल्हापुरातील जन्म, विदेशी जोडप्यांनी त्यांच्याकडून घेतलेली सेवा, त्यांच्या कामगिरीची दोन वेळा ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये झालेली नोंद आणि एकाच कुटुंबातील ३५ जणांचा पत्की हॉस्पिटलमध्ये झालेला जन्म अशा अनेक रोचक गोष्टी सांगितल्या. त्यांना उपस्थितांनी दाद दिली. ‘भक्ती ईश्वराची करा, सेवा मानवाची करा’ हे विद्यापीठ हायस्कूलचे ब्रीदवाक्य मी अमलात आणत असल्याचे पत्की म्हणाले.