कोल्हापूर : जुन्या पेन्शनसंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्याच्या सरकारच्या भूमिकेचा निषेध करत एनपीएस' पेन्शनधारक कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन प्रशासन व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा संप स्थगित करत आहे, अशी घोषणा निमंत्रक अनिल लवेकर यांनी शुक्रवारी केली. दुपारनंतर जिल्ह्यातील ६५ हजार कर्मचारी, शिक्षक पूर्ववत कामावर हजर झाले.कोल्हापूरतील संघटनेला हा निर्णय मान्य नाही, राज्य सरकारने व समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीला विश्वासात न घेता संप मागे घेतल्याचा निषेध व्यक्त केला आहे. विविध राज्यस्तरीय संघटनांकडून आदेश आल्याने तसेच कर्मचारी, शिक्षक कामावर हजर होत आहेत त्यामुळे हा संप तात्पुरता स्थगित करत आहोत, परंतु अधिवेशनापर्यंत वाट पाहू अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा लवेकर यांनी दिला आहे. टाऊन हॉल उद्यान येथे आंदोलनस्थळी शुक्रवारी सरकारी कर्मचारी शिक्षष्य, शिक्षकेतर कर्मचारी व एनपीएस पेन्शनधारक कर्मचारी यांच्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील समन्वय समितीने ही भूमिका जाहीर केली. यावेळी निमंत्रक अनिल लवेकर यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, प्रशासन व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून 'एनपीएस' कर्मचारी यांच्याशी चर्चा करुन संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ व १३ डिसेंबरला काही आमदारांनी जुन्या पेन्शनसंदर्भात अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला होता. त्यावर गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये पेन्शनबाबत निर्णय घेण्याची उत्तर दिले. परंतु सरकारने जुन्या पेन्शनबाबत नेमलेल्या समितीकडून अहवाल प्राप्त झाला असताना या अधिवेशनात तो मांडून निर्णय का घेतला नाही ? असा सवाल करून सरकारची भूमिका ही आचारसंहिता लागेपर्यंत टाळण्याची आणि कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याची असल्याचा आरोप केला. यावेळी दिलीप पवार, वसंत डावरे, भरत रसाळे, राहुल शिंदे, अनिल घाटगे, सुधाकर सावंत, रमेश भोसले, नंदकुमार इंगवले, उदय लांबोरे, राजन नाळे, प्रदीप शिंदे, संदीप पाटील, संजिवनी दळवी, राणी शिरसाद, सतीश ढेकळे, अमर पाटील, सुशांत पाटील, गजानन पवार, बाजीराव कांबळे, अतुल काकडे, कुमार कांबळे, आर. आर. पाटील आदी उपस्थित होते.६५ हजार कर्मचारी कामावरसंपामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, सर्व प्रांताधिकारी कार्यालये, तहसीलदार कार्यालये, शासकिय मुद्रणालय, आरोग्य, कृषी, शिक्षण, जी, एसटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोषागार कार्यालय, पाटबंधारे आदी शासकिय कार्यालये व शाळा बंद असल्याने दिवसभर शुकशुकाट होता, परंतु संप स्थगित झाल्याने शुक्रवारी दुपारनंतर जिल्ह्यातील ६५ हजार कर्मचारी कामावर हजर झाले.
जुनी पेन्शन: सरकारच्या भूमिकेचा निषेध; कोल्हापुरातील शासकीय कर्मचाऱ्यांचा संप स्थगित
By संदीप आडनाईक | Published: December 15, 2023 6:44 PM