कोल्हापूर : तीन दिवसांच्या संपानंतर शुक्रवारी शासकीय कार्यालये गजबजली; तर शाळांचा परिसरही फुलून गेला. आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारल्याने शासकीय कार्यालये आणि शाळा ओस पडल्या होत्या.सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा आणि सेवानिवृत्तीचे वय ६0 या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस शासकीय कर्मचारी संपावर गेले होते. त्यांना पाठिंबा देत शिक्षक, ग्रामसेवकही संपात उतरल्याने संपाची व्याप्ती वाढली होती.
आधी राजपत्रित अधिकारी महासंघही संपात सामील होणार होता. मात्र शेवटच्या टप्प्यात अधिकारी संपातून बाहेर पडले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये केवळ अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले.शुक्रवारी संप मागे घेतल्याची घोषणा मुंबईतून केली असली तरी आरोग्य विभाग वगळता अन्य सर्वजण शुक्रवारीच कामावर हजर झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातही अभ्यागतांची वर्दळ वाढली होती. जिल्हा परिषदेत तर सर्वसाधारण सभेमुळे मोठी गर्दी झाली होती. अन्य शासकीय कार्यालयांमध्येही सकाळी दहापासून नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले.गेले तीन दिवस सुनासुना वाटणारा शाळांचा परिसरही विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शुक्रवारी पुन्हा गजबजून गेला. तीन दिवसांनंतर एकत्र आलेले शिक्षकही संपाची चर्चा करताना दिसत होते. तीन दिवसांचा हा संप मिटल्याने पुन्हा ‘रुटीन’ सुरू झाल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त होत होती.
पगारकपातीची चर्चातीन दिवस संपावर गेल्याने या दिवसांची पगार कपात करण्याचा शासनाचा प्रचलित नियम आहे. मात्र काही शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी पगार कपात होणार नाही, असे संदेश पाठविल्याने शिक्षकांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. मात्र अशा पद्धतीचे कोणतेही शासकीय सुधारित परिपत्रक आले नसल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. हे तीन दिवस अर्जित रजेमध्ये रूपांतरित करावेत, असा शासन आदेश आल्यास तशी कार्यवाही होईल; अन्यथा कपात अटळ असल्याचे सांगण्यात आले.