कोल्हापूर : कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांकरिता कसबा बावडा येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये क्रीडा उपसंचालकांचे कार्यालय आहे; मात्र, या कार्यालयाला कायमस्वरूपी क्रीडा उपसंचालकांची नेमणूक नसल्याने सर्व कारभार प्रभारींवरच सुरू आहे. खेळाडूंच्या प्रमाणपत्र पडताळणीसारखी कामे प्रलंबित राहिल्याने खेळाडूंसह पालकांची फरफट होत आहे.गेल्या काही वर्षांपासून क्रीडा उपसंचालक कार्यालयाचा कारभार प्रभारींवरच सुरू आहे. यात कधी सातारा, तर कधी सांगली येथील जिल्हा क्रीडाधिकारी यांच्यावर अतिरिक्त कार्यभार म्हणून उपसंचालक कार्यालयाचा कार्यभार दिला गेला. सद्य:स्थितीत या कार्यालयाचा कार्यभार पुणे येथील क्रीडा उपसंचालकांकडे आहे; त्यामुळे अनेकदा या कार्यालयातील कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ती पुणे येथे पाठविली जातात.
यात खेळाडूंसह त्यांच्या पालकांची फेऱ्या मारून अक्षरश: दमछाक होत आहे. विशेष म्हणजे दिव्यांग खेळाडूंसह पालकांचाही समावेश आहे. यात दिव्यांग धावपटू अजय सखाराम वावरे या कसबा बावडा येथील दिव्यांग धावपटूने २०१२ साली बंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय दिव्यांग स्पर्धेतील प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी जुलै २०१८ मध्ये प्रस्ताव सादर केला होता. त्याची आई कल्पना चौकशीसाठी गेल्यानंतर कधी प्रभारी अधिकारी असलेले नसतात. तर कधी अन्य कारण सांगून बोळवण केली जात आहे.
विशेष म्हणजे अजयची आई कल्पना या पतीचे निधन झाल्याने स्वत: स्वयंपाकाची कामे करून अजयच्या खेळाला प्रोत्साहन देत आहेत. अजयला हाताला अपंगत्व आहे. पहाटे पाचपासून तो धावण्याचा सराव करतो. त्याला २०२० च्या पॅराआॅलिम्पिकमध्ये भारतातर्फे प्रतिनिधित्व करायचे आहे. सध्या त्याचे वय १८ वर्षे आहे; त्यामुळे त्याला नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करायची आहे. त्याकरिता तो प्रयत्न करीत आहे. मात्र, त्याला या सरकारी कामाचा असा अनुभव येत आहे.
अजयची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी या क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडे कागदपत्रे जुलै २०१८ मध्ये दिली आहेत; मात्र, प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देऊन आमची बोळवण केली जात आहे.- कल्पना वावरे, दिव्यांग खेळाडू अजयची आई