संतोष मिठारी
कोल्हापूर : गवत, विविध रोपे, चिंच आणि नारळ यांच्या विक्रीतून शिवाजी विद्यापीठाच्या उत्पन्नवाढीला हातभार लागत आहे. या विक्रीतून वर्षाकाठी विद्यापीठाला सुमारे पाच लाख रुपये मिळतात.विद्यापीठाचा परिसर ८५० एकरांमध्ये पसरलेला आहे. वृक्षांचा आणि मोकळा परिसर असलेल्या ६०० एकर परिसरात गवत उगविते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा ते अज्ञातांकडून पेटविण्याचा प्रकार होतो.
या आगीमुळे झाडांची हानी होते. त्यामुळे विद्यापीठातर्फे दरवर्षी निविदा पद्धतीने या गवताची विक्री केली जाते. त्यातून सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. पर्यावरणशास्त्र विभाग, प्रौढ निरंतर शिक्षण विभाग आणि विद्यापीठाच्या मुख्य इमारत परिसरात चिंच आणि लोककला केंद्राच्या मागील बाजूस नारळाची झाडे आहेत. त्यांच्या विक्रीमधून साधारणत: २५ हजार रुपये मिळतात.
हे उत्पन्न विद्यापीठ परिसरातील झाडांच्या संवर्धनासाठी खर्च केले जाते. दरम्यान, गेल्या वर्षी विद्यापीठाने संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या मागील विहिरीच्या परिसरात नारळाची १६१ झाडे लावली. त्यात यावर्षी ४० झाडांची भर पडणार आहे.
आठ नंबरचे प्रवेशद्वार ते क्रांतिवन मार्गावरील दोन्ही बाजूंना चिंचेची आणि मुद्रणालयाच्या परिसरात आवळ्याची प्रत्येकी २०० झाडे लावली आहेत. त्यांतून येत्या काही वर्षांत विद्यापीठातील जैवविविधतेला बळ आणि उत्पन्नवाढीसाठीचा हातभार वाढणार आहे.
सव्वा लाख रोपांची विक्रीविद्यापीठातील वनस्पतिशास्त्र अधिविभागातील लीड बॉटनिकल गार्डनद्वारे स्थानिक, डोंगरी परिसरातील विविध प्रजातींच्या रोपांची नाममात्र दरात विक्री केली जाते. काही सामाजिक संस्थांना ती मोफत दिली जातात.
दरवर्षी विविध रोपांच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. गेल्या वर्षी विभागाने सव्वा लाख रोपे वितरित केली. त्यातील सुमारे ४० हजार रोपांच्या विक्रीतून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे वनस्पतिशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.
आग लागून झाडांची हानी होऊ नये म्हणून गवत आणि पक्ष्यांनी खाऊन राहिलेल्या फळांची विक्री केली जाते. पैसे मिळविणे हा त्यामागील उद्देश नाही. जैवविविधतेला बळ देण्यासाठी या वर्षी नारळ, आवळा आणि चिंचेची झाडे लावली आहेत. फळझाडांमध्ये स्थानिक प्रजातींची झाडे आवर्जून लावली जात आहेत.-डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, उद्यान विभाग, शिवाजी विद्यापीठ