कोल्हापूर : हज यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या भाविकांना विमानातील प्रवास, प्रवासादरम्यान घ्यावयाची दक्षता व काळजी याबाबतचे मार्गदर्शन शनिवारी केंद्रीय हज कमिटीचे प्रशिक्षक राजमहंमद तांबोळी (जालना)यांनी येथे केले. मुस्लिम बोर्डिंग येथे कोल्हापुरातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना मार्गदर्शनपर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तांबोळी यांनी भाविकांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच स्लाईड शोच्या माध्यमातून यात्रेदरम्यान करावयाच्या विधीची माहिती दाखविली. आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यापूर्वी घ्यायचे इंजेक्शन, विमान प्रवासा दरम्यान आसन व्यवस्थेसह आपल्या साहित्याची सुरक्षा कशी करावी तसेच आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी? याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.
सौदी सरकारची यात्रेसाठी कडक नियमावली आहे. त्याचे पालन कसे करावे, य त्रेदरम्यान काही समस्या उद्भवल्यास कुठे संपर्क साधावा आणि यात्रा कालावधीत करावयाचे विधी याबाबत तांबोळी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.हाजी दिलावर मुल्लाणी यांनी हज यात्रेकरूंच्या शंकांचे निरसन केले. या शिबिरात ५०० हून अधिक हज यात्रेकरू सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा हज कमिटीचे अध्यक्ष हाजी इक्बाल देसाई, नजीर मिस्त्री, बाबासाहेब शेख, हाजी जहॉँगीर अत्तार, सादिक जमादार आदींसह कमिटीचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.