कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी २०१६-१७ मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेसाठी मंजूर असेलल्या सहा कोटींपैकी तीन कोटी म्हणजे अर्धाच निधी खर्च केला आहे. त्यामुळे हा सर्व निधी ३१ मार्चपर्यंत खर्च झाल्याशिवाय सन २०१७-१८ साठी मंजूर झालेला सात कोटींचा निधी वितरित केला जाणार नाही, अशा सक्त सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे संबंधित यंत्रणेला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतील खर्चाचा आढावा आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हाधिकारी (महसूल), अरविंद लाटकर, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नितीन देसाई, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतून महानगरपालिका आणि नगरपालिकांना कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा निधी दोन वर्षांमध्ये संपूर्ण खर्च होणे आवश्यक आहे, असे असतानाही अनेक यंत्रणांकडील हा निधी अद्यापही अखर्चित आहे. योजनेतील सन २०१६-१७ चा निधी मार्चअखेरपर्यंत संपूर्ण खर्च करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे यंत्रणांनी तो खर्च करावा त्याशिवाय सन २०१७-१८ मधील निधी वितरित केला जाणार नाही. त्याचबरोबर या कामांचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखापरीक्षण करून घ्यावे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.‘नावीन्यपूर्ण’मधील तीन कोटींच्या कामांना मान्यतानाविन्यपूर्ण योजनेत जिल्ह्याला ११ कोटींचा निधी प्राप्त असून, आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपयांच्या कामाच्या मान्यता देण्यात आल्या आहेत. यंत्रणांनी या योजनेसाठीही प्रस्ताव तत्काळ प्रशासनाकडे द्यावेत. या योजनेतून शहर व जिल्ह्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात, असे मंत्री पाटील म्हणाले.समाजकल्याण विभागाने दक्ष राहावेनागरी वस्ती सुधार योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे त्यादृष्टीने समाजकल्याण विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.शहरातील आमदारांना निधी उपलब्ध करून द्यावामहानगरपालिकेने शहरातील आमदारांच्या कामांसाठीही निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; तसेच महानगरपालिकेने पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाकडे तत्काळ प्रस्ताव द्यावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरविंद लाटकर, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, आमदार राजेश क्षीरसागर, नितीन देसाई उपस्थित होते.