कोल्हापूर : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज, शनिवारी येथे झालेल्या ‘कॉफी विथ नितिनजी’ कार्यक्रमात गेल्या दहा वर्षातील यशस्वी प्रकल्पांची मालिकाच आपल्या मनोगतातून मांडली आणि कोल्हापूरच्या विविध क्षमतांचीही उजळणी केली. ‘सेतू’संस्थेच्यावतीने आयोजित या कार्यक्रमासाठी खासदार धनंजय महाडिक, सुनील देवधर आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, कोल्हापुरातील उद्योजक, व्यावसायिक, वकील, सीए, उपस्थित होते. गडकरी म्हणाले, कोल्हापूर हे साखर कारखान्याचे माहेरघर आहे. त्यामुळे आता आपण इथेनॉल उद्योग २ लाख कोटी रूपयांचा करणार आहोत. त्यामध्ये या कारखान्यांनी भरीव योगदान दिल्यास त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल. हुपरीच्या चांदी उद्योगासाठी सिल्वर डिझाईन इन्स्टिट्यूट, टेक्टाईल डिझाईन इन्स्टिट्यूट सुरू करण्याची गरज असून अॅटोमोबाईल क्षेत्रातील मोठे हब बनण्याची कोल्हापूरची क्षमता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दळणवळणाबाबत अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने देशभरात प्रचंड कामे करता आली. त्यातून भारत आता अॅटोमोबाईल क्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. विकासाचा हाच प्रवास सुरू ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापूरच्या क्षमतांची नितीन गडकरींकडून उजळणी
By समीर देशपांडे | Published: May 04, 2024 1:38 PM